मुंबई: पावसाने मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर मार्गावरील गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे. गाड्या एकामागे एक उभ्या आहेत. सकाळी कचेरी गाठण्यासाठी बाहेर पडलेले नोकरदार अद्यापही गाड्यांमध्ये अडकले आहेत. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक सुरळीत राहण्याचे दावे पहिल्याच पावसाने खोटे ठरवले आहेत. रेल्वे रुळांवर पाणी तुंबले आहे. त्यामुळे एकूणच पावसाळापूर्व कामांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेल्वेने या परिस्थितीबाबत मुंबई महापालिका प्रशासनाकडे बोट दाखवले आहे.

मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि मुंबई पालिकेच्या भुयारी नाले ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ‘एक्स’वरून मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने माहिती दिली.दरम्यान सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मस्जिद, भायखळा, दादर, शीव दरम्यान पाणी साचल्याने अनेक लोकल एका मागे एक उभ्या आहेत. कुर्ला ते शीव दरम्यान लोकलच्या रांगा लागल्या आहेत.

शेकडो प्रवासी लोकलमध्ये ताटकळत बसले आहेत. मस्जिद आणि भायखळा दरम्यान पाणी साचल्याने, लोकल भायखळापर्यंत चालवून पुन्हा डाऊन मार्गावर धावत आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच ज्या लोकल कुर्ल्यापर्यंत पोहचल्या आहेत, त्यांना कुर्ल्या स्थानकात रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे कुर्ला-सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे.

कुर्ला स्थानकात लोकल पोहचल्यानंतर, ही लोकल रद्द केली असून, सीएसएमटी लोकल जाणार नाही, अशी स्थानकात उद्घोषणा केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडला आहे. कुर्ला ते शीव दरम्यानच्या ४ मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना ४० मिनिटे लागले आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.