गेल्या काही दिवस अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने उसंत घेतली नाही. त्यामुळे मुंबईतील सखल भागांत पावसाचे पाणी साचले. अंधेरीमधील भुयारी मार्गात पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कोकण-गोवा, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार मुंबईसह, कोकणात, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार कोसळत आहे. मंगळवारी दिवसभर पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसामुळे वाहतुकीवर परिणाम

मुंबईत सकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. हिंदमाता, अंधेरी, महालक्ष्मी येथे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. अंधेरी सब-वे येथील वाहतूक काही काळ बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पावसामुळे तेथे अर्धाफुट पाणी साचले होते. याशिवाय परळ – दादरदरम्यान हिंदमाता जंक्शन येथेही अर्धा फुट पाणी साचले होते. त्यामुळे तेथील वाहतूक संथगतीने सुरू होती. महालक्ष्मी जंक्शन येथेही अर्धा फुट पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला होता. या तीन्ही ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते.

याशिवाय मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या पुलावरील दक्षिण वाहिनीवर वाहतूक मंदगतीने सुरू होती. खार सब-वे येथेही वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अंधेरी सबवे येथे पाणी साचल्यामुळे काही काळ तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र तेथील वाहतूक दुपारी सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला अंदाज
पालघर, नंदुरबार, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत मध्यम ते तीव्र पावसाचा पाऊस पडेल.

मुंबईत दुपारी १ ते २ वाजेपर्यंत अधूनमधून तीव्र पावसाच्या सरी कोसळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे, सातारा घाट, दक्षिण कोकणातील काही भागात दुपारी १ ते २ दरम्यानत तीव्र पावसाची शक्यता आहे.