मुंबई : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. ठराविक भाग वगळता अजूनही इतर भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे परिसराला आज दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात पाऊस पडला. उर्वरित भागात मात्र फारसा पाऊस अजून झालेला नाही. मुंबईसह कोकणात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली निवळून जाणार आहे. तोपर्यंत कोकण आणि घाट परिसरात पावसाचा जोर अधिक असणार आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक भागात मुसळधार पावसाचा अंदाज (यलो अलर्ट) व्यक्त केला आहे. विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे. मोसमी वाऱ्यांनी रविवारी संपूर्ण लडाख, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा काही भाग, पंजाबच्या काही भागात वाटचाल केली आहे. येत्या दोन दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंडीगड आणि दिल्लीचा आणखी काही भाग तसेच राजस्थानच्या काही भागात मोसमी वारे वाटचाल करण्याची शक्यता आहे.

राज्यात १ ते २२ जूनपर्यंत झालेला पाऊस (मिमीमध्ये)

मुंबई शहर – ४७८.२ मिमी

मुंबई उपनगर – ४२५.२ मिमी

डहाणू – ४२५.५ मिमी

अलिबाग – ५२४.२ मिमी

हर्णे – ४०३.६ मिमी

रत्नागिरी – ५८८.५ मिमी

ठाणे- ४८२ मिमी

अहिल्यानगर – ८८ मिमी

जळगाव-८० मिमी

कोल्हापूर – २३१.८ मिमी

मालेगाव – ४९.६ मिमी

पुणे शहर – २४१.१ मिमी

सांगली – १०५.२ मिमी

महाबळेश्वर – ९५९.६ मिमी

जेऊर – २३.६ मिमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर – ४८.२ मिमी