मुंबई : गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी मुंबईत दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सकाळपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे गोविंदा पथकांना आपापल्या परिसरातून मार्गस्थ होताना निरनिराळ्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुंबई शहर तसेच उपनगरात गुरूवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. गेल्या दोन – तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, मुंबईत फारसा पाऊस नसल्यामुळे उकाड्याने असह्य होत होते. दरम्यान, आज मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.तसेच गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्वत्र पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचा : गोष्ट असामान्यांची Video: ट्रेकिंग ते महाराष्ट्रातील पहिलं दृष्टिहीन गोविंदा पथक, अंधांना नवा दृष्टीकोन देणारे – पोन्नलागर देवेंद्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.