मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मतभेद विसरून एकत्र येत असताना शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यातही राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे संकेत ठाकरे गटाचे नेते विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी दिले होते. यासाठी राज ठाकरेंना आमंत्रण दिले जाऊ शकते असेही ते म्हणाले होते. मात्र त्यांचे हे विधान शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी खोडून काढले आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा (ठाकरे) असतो त्यामुळे राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या (ठाकरे) परंपरेनुसार दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर साजरा केला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या दिवशी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात व पक्षाची पुढील वाटचाल निश्चित केली जाते. हिंदी सक्ती विरोधातील मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात २० वर्षांनंतर पुन्हा सख्य निर्माण झाले. दोन्ही कुटुंबात संवाद सुरू असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोघेही एकत्र लढणार असल्याची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आमदार सचिन अहिर यांनी दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना आमंत्रण देण्याची शक्यता असल्याचे विधान केले.
यंदाच्या दसऱ्याला एक चांगली बातमी मिळू शकते. कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिले जाऊ शकते. दसरा मेळाव्यात आमचे नेते सद्यस्थितीचा आढावा घेतील आणि भविष्यातील दिशा कार्यकर्त्यांना देतील. त्यामुळे हा मेळावा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ नेहमीच एकमेकांकडे लक्ष ठेवून असतात. दोघे दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. मात्र, आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही, असेही अहिर म्हणाले. जसे आमचं स्वतंत्र दसरा मेळाव्याचे व्यासपीठ असते, तसे त्यांचेही असते. त्यामुळे तेही आम्हाला आमंत्रित करू शकतात, असे देखील सचिन अहिर यांनी म्हटले.
मात्र ही शक्यता संजय राऊत यांनी नाकारली आहे. दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत आपल्याला माहित नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो. आमचीही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसे होणे शक्य नाही. दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात. भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे. ६० वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.