मुंबई : रेल्वे डब्यांचे आयुर्मान संपल्यानंतर हे डबे भंगारात विकले जात होते. परंतु, या डब्यात नाविन्यपूर्ण बदल करून, त्यात रेस्टॉरंट साकारण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेवरील हेरिटेज स्थानक असलेल्या वांद्रे स्थानकात ‘रेल कोच रेस्टॉरंट’ उभे राहिले आहे.
रामदास आठवले आणि आशिष शेलार यांनी केले उद्घाटन
वांद्रे स्थानक महोत्सवाचा भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने शनिवारी वांद्रे रेल्वे स्थानकावर एक अनोखे ‘रेल कोच रेस्टॉरंट’ सुरू केले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी या ‘रेल कोच रेस्टॉरंट’ उद्घाटन केले.
आकर्षण केंद्रबिंदू ठरणार
मुंबई फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि प्रवाशांना आलिशान वातावरण आणि स्वादिष्ट जेवणाचा अनुभव देण्यासाठी खास रेस्टॉरंट तयार केले आहे. हे रेस्टॉरंट आठवडायाचे सर्व दिवस 24 तास सुरू राहील. हे रेस्टॉरंट वातानुकूलित असून बसण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ मिळतील. त्यामुळे प्रवासी, पर्यटक आणि खवय्यांना आवडीनिवडींचे चमचमीत पदार्थ खाता येणार आहेत.
अशी जन्माला आली रेस्टॉरंटची संकल्पना
मुंबई शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थांची दुकाने असली तरी बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असे रेस्टॉरंट नव्हते. त्यामुळे प्रवाशांची गैरसाेय व्हायची. प्रवाशांना रेल्वे हद्दीतच चांगल्या दर्जाचे रेस्टॉरंट व खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिल्यास उत्पन्नही मिळेल, या उद्देशाने भारतीय रेल्वेने ‘रेल कोच रेस्टॉरंट’ ही संकल्पना सुरू केली आहे. नाॅन फेअर रेव्हन्यू अंतर्गत भारतीय रेल्वेने ‘रेल कोच रेस्टॉरंट’ची योजना सुचविली आहे. ज्या ठिकाणी प्रवाशांची संख्या जास्त असते, त्याठिकाणी रेस्टॉरंट उघडावे, अशा सूचना रेल्वे मंडळाकडून देण्यात आली आहे.
महसूल मिळवण्याचा नवा मार्ग
रेल्वे डब्यांचे आयुर्मान संपल्यानंतर ते मध्यवर्ती कार्यालयाच्या कार्यशाळेत पाठवून दिले जातात. त्याठिकाणी डब्यांची चाके, ट्रॉली व आवश्यक बाबी वेगळ्या काढल्या जातात. त्यानंतर त्याचे तुकडे करून ते भंगारात विक्री होतात. तर, आता काही आयुर्मान संपलेल्या रेल्वे डब्यात रेस्टॉरंट तयार करून महसूल मिळवण्याचा नवा मार्ग रेल्वे विभागाला मिळाला आहे.
‘उपनगरीय राणी’ म्हणून ओळख
वांद्रे स्थानक सुरू करण्याचा प्रस्ताव १८६४ साली मंजूर करण्यात आला. त्यानंतर १८६९ साली वांद्रे स्थानकातून लोकल सेवा सुरू झाली. वांद्रे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि फलाटाचे सुशोभिकरण करण्यात आले. हे काम १८८८ पर्यंत केले. या सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरणाच्या कामामुळे या वास्तूला १९९५ साली जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. वांद्रे स्थानक उपनगरीय मार्गावरील आकर्षिक स्थानक असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ असे संबोधले जाते. वांद्रे स्थानक हे हेरिटेज ए-वन दर्जा असलेले स्थानक आहे.