मुंबई : बोधगया (बिहार) येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ते बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे. म्हणूनच ‘महाबोधी महाविहार मुक्ती’साठी मुंबईत १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आयोजित केलेल्या मोर्चामध्ये आंबेडकरी -बौद्ध जनतेने गटतट विसरुन लाखोंच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री व ‘रिपाइं’ अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.

वांद्रे येथे सोमवारी महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चाच्या प्रचारासाठी बनवलेल्या धम्मरथाचे उद्घघाटन मंत्री आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘रिपाइं’चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, धम्म रथाचे संयोजक व उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, भदन्त शांतीरत्न थेरो, युवक आघाडी मुंबई अध्यक्ष सचिन मोहिते उपस्थित होते.

बिहारच्या बी.टी. कायद्यात सुधारणा करुन महाबोधी महाविहराचे सर्व विश्वस्त बौद्ध धर्मीय असावेत, अशी तरतूद करावी. या मागणीसाठी १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात मोर्चाचे आयोजित करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये बौद्धांनी अभूतपूर्व ताकद दाखवावी. तरच अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला महाविहारचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे, असे आठवले म्हणाले. हा मोर्चा १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी आयोजित करण्यात आला आहे.

बिहारमधील ज्या पिंपळ वृक्षाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्त झाली, त्या जागी बांधलेला महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी गेले अनेक महिने बौद्ध भिख्खु व बौद्ध धर्मिय आंदोलन करत आहेत. मात्र बिहार राज्य सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या आंदोलनाला जराही प्रतिसाद दिलेला नाही. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनात भाग घेतला आहे. रामदास आठवले हे भाजपच्या ‘एनडीए’ आघाडीत असून ते केंद्रात मंत्री आहेत. केंद्रात व बिहारमध्ये भाजपचे सरकारे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाच्या विरोधातील या मोर्चाला बौद्ध धर्मीय कितपत प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे.

या आंदोलनात बहुसंख्य आंदोलक महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी १४ ऑक्टोबर रोजी मुंबईत विशाल महामोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा रिपाइं गटांचा नसून बौद्ध धर्मियांचा आहे. मोर्चासाठी सर्व रिपाइं नेते मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच अनेक शहरांमध्ये बौद्धांनी मोर्चे काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुंबईचा १४ ऑक्टोबरचा मोर्चा विराट होण्याचा अंदाज आहे.