मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या ढिसाळ कामकाजावर टीका होऊ लागली आहे. आमदार नितेश राणे यांनी यानिमित्ताने शिवसेनेवर टीका करत पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा असा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ‘पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाइट लाइफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली महापालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही ?’, असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि ब्रीज ऑडिटची चर्चा सुरु होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही’.

‘सर्वात श्रीमंत महापालिका पण आयुष्याची काही किंमत नाही’, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. आता काही अधिकाऱ्यांना निलंबित करत किंवा टार्गेट करत कमला मिल्स, एल्फिन्स्टन पूल आणि घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रमाणे चौकशी बसवली जाईल असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला आहे.

नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. सायंकाळी दादाभाई नौरोजी मार्ग गर्दीने फुलून जातो. या मार्गावरील बी. टी. लेन येथून टर्मिनसमध्ये जाणारा हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.

पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.

चौकशीचा आदेश
मुंबईतील सर्व पुलांची संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आली होती. त्या तपासणीत हा पूल चांगला असल्याचा आणि किरकोळ डागडुजीची शिफारस करणारा अहवाल देण्यात आला होता. तरीही हा पूल पडल्याने दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर संरचनात्मक तपासणीत कसूर झाली असल्यास दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

वाहतूक आजही रखडणार?
दुर्घटना स्थळाची शुक्रवारी पाहणी करून दादाभाई नौरोजी मार्गावरील वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक सुरू होईपर्यंत सीएसएमटीकडे येणारी आणि तेथून उपनगरांकडे जाणारी वाहतूक मेट्रो चौकातून वळविण्यात आली आहे, असे सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rather than pampering penguins why doesnt sena led bmc try saving real lives ask nitesh rane
First published on: 15-03-2019 at 08:18 IST