scorecardresearch

बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवरील हल्ले ते पंजाबमधलं हत्याकांड; ठाकरे सरकारला एकनाथ शिंदेंनी लिहिलेलं पत्र जसंचं तसं

शिंदे गटाच्या आमदारांनी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणारे हल्ले ते पंजाबमध्ये सुरक्षा काढल्यानंतर झालेल्या हत्याकांडाचा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे गटाचं हेच पत्र जसंचं तसं…

Read detail letter of rebellion Shivsena MLA Eknath Shinde group to Uddhav Thackeray over security
बंडखोर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस विभागाला पत्र लिहिलं आहे.

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारवर बंडखोर आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढल्याचा आरोप केलाय. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलीस विभागाला पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. ३८ आमदारांच्या स्वाक्षरीसह दिलेल्या पत्रात शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर होणारे हल्ले ते पंजाबमध्ये सुरक्षा काढल्यानंतर झालेल्या हत्याकांडाचा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे गटाचं हेच पत्र जसंचं तसं…

प्रति,

उद्धव ठाकरे
(मुख्यमंत्री)

दिलीप वळसे पाटील
(गृहमंत्री, महाराष्ट्र)

रजनीश सेठ
(पोलीस महासंचालक, महाराष्ट्र)

सर्व पोलीस आयुक्त (महाराष्ट्र)

विषय – पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांची व कुटुंबीयांची सुडापोटी सुरक्षा काढल्याबाबत…

१. या पत्रावर स्वाक्षरी करणारे आम्ही शिवसेनेचे आमदार २०१९ मध्ये १४ व्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलो आहोत.

२. आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

३. आम्हाला सुरक्षा देण्याचं कारण आमच्या जीवाला असलेला धोका आहे, आम्ही कोणत्या बाजूचं राजकारण करतो हे नाही. असं असलं तरी ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे.

४. पोलीस सुरक्षा काढून आमच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे. सोबतच मविआचे नेते आपआपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहेत. याबाबत २३ जूनला माध्यमांमधूनही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संजय राऊत यांनी महाराष्ट्र सोडणाऱ्या आमदारांना पुन्हा महाराष्ट्र येणं आणि महाराष्ट्रात फिरणं अवघड जाईल, असं वक्तव्य केलं होतं.

५. या वक्तव्यांचा परिणाम म्हणजे आमच्या दोन सदस्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले.

६. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा काढून घेण्याचा असा प्रकार पंजाबमध्येही झाला होता. त्यानंतर तेथे या व्यक्तींना गुंडांनी लक्ष्य केल्याचं समोर आलं. महाराष्ट्रात आमदारांची सुरक्षा काढल्याने अशाच घटना होऊ शकतात.

७. प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा द्यायला हवी ती तात्काळ द्यावी. तसेच आमच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे असे मविआचे नेते जबाबदार राहतील.

या पत्राच्या शेवटी एकनाथ शिंदे गटातील बंडखोर ३८ आमदारांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Read detail letter of rebellion shivsena mla eknath shinde group to uddhav thackeray over security pbs

ताज्या बातम्या