मुंबई : प्रभादेवीचा पूल पाडायला सुरुवात केल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा असलेला हा पूल पाडल्यामुळे दादरचा टिळक पूल, करीरोड पुलावरील वाहतूकीचा ताण वाढू लागला आहे. त्यातच मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला विलंब झाला असून हा पुलही रखडला आहे. मुंबईत सध्या मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल, शीव पूल, महालक्ष्मी पूल आणि विद्याविहारचा पूल यांची कामे सुरू असून ही कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश महापालिका अधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.
मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या पुलाची कामे सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले, तरी दुसरा पूल पाडलेला असतो. त्यामुळे वाहतूक कोंडी ही मुंबईकरांच्या नशिबी कायम आहे. लोअर परळचा पूल, गोखले पूल सुरू झाले असले तरी एका बाजूला मुंबई सेंट्रलचा पूल, महालक्ष्मी पूल यांची कामे सुरू आहेत. तर शीव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यातच आता प्रभादेवीचा पुलही बंद करण्यात आल्यामुळे मध्य मुंबईत पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे बसमार्गही वळवण्याची वेळ आली आहे.
या पार्श्वभूमीवर शीव (सायन) उड्डाणपूल, बेलासिस उड्डाणपूल, विद्याविहार उड्डाणपूल आणि महालक्ष्मी येथील ‘केबल स्टेड पूल’ या रेल्वे उड्डाणपुलांच्या पुनर्बांधणीच्या कामांचा आढावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर व पोलीस सह आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांनी मंगळवारी घेतला. मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीस महापालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शीव पुलाचे काम रखडले
शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणाऱ्या शीव (सायन) उड्डाणपुलाचे बांधकाम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूकडील पादचारी पुलाचे (FOB) काम रेल्वे विभागातर्फे करण्यात येत आहे. हे काम ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, त्यास विलंब झाला आहे. आता पादचारी पुलाचे काम ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची हमी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पादचारी पूल उभारल्यानंतरच पुलाचे पाडकाम पूर्ण केले जाईल. उर्वरित कामे लवकर व्हावीत, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले.
बेलासिस पूल वेळेआधी ?
ताडदेव – नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीस वेग आला आहे. पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पश्चिम रेल्वे करत असून पुलाच्या पोहोच रस्त्याची उभारणी मुंबई महापालिका करत आहे. या अंतर्गत पहिल्याच टप्प्यात रेल्वे कंत्राटदाराने ३६ मीटर स्पॅनच्या एकूण १२ तुळया स्थापित (Girder Launching) करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित कामांसाठी वाहतूक व वीजपुरवठा या दोन्ही घटकांमध्ये ४० खंड (ब्लॉक) घेतले जाणार आहेत. पुलाच्या बांधकामाचा विहित कालावधीत ३१ मे २०२६ आहे. त्यापूर्वी ६ महिने अगोदर म्हणजेच, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बेलासिस उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
विद्याविहार पूल मे २०२६ पर्यंत
पूर्व उपनगरातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. तर, पश्चिम बाजूकडील प्रकल्प बाधित व्यक्तींचे पर्यायी सदनिका देऊन पुनर्वसन करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ५ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बाधितांसाठी निवासी सदनिका निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसांत विभाग कार्यालयाच्या (Ward Office) माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केले जाईल व बांधकामांचे निष्कासन केले जाईल. त्यानंतर, पुढील पाच महिन्यांत म्हणजेच ३१ मे २०२६ पर्यंत पुलाची उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले.
महालक्ष्मी पूल नोव्हेंबर २०२६ पर्यंत
महालक्ष्मी येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे दोन नवीन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलांमुळे वाहतुकीचे नियमन सुरळीत होणार आहे. केशवराव खाड्ये मार्गावर महालक्ष्मी येथे उभारण्यात येणारा ‘केबल स्टेड पूल’ हा रेल्वे रूळांवरील महापालिकेचा पहिला केबल आधारित पूल आहे. बांधकामासह पुलाची अनुषंगिक कामे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्टय ठेवण्यात आले आहे.