मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मूर्तीच्या विसर्जनाचा तिढा न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर गुरुवारी सुटला. न्यायालयाने सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्याची परवानगी दिल्यामुळे मूर्तिकार व गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत केले जात आहे. सहा फुटांवरील मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास परवानगी असली तरीही त्याखालील उंचीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे लागणार आहे.

गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असून विविध गणेश मंडळांची मंडप उभारणी व सजावटीसाठी लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील विविध गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिकांकडूनही त्याबाबतच्या परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच न्यायालयाने मोठ्या पीओपी मूर्तींबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कृत्रिम तलावात मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करताना गणेशभक्तांना अनके समस्या येतात. तसेच ही यंत्रणा उभारताना प्रशासनालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून तयार केलेल्या मूर्तींवर निर्बंध घातल्यानंतर गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर, शासनाविरोधात गणेशभक्तांची वाढती नाराजी लक्षात घेऊन राजकीय हस्तक्षेप सुरू झाला आणि पीओपी मूर्तींबाबत सकारात्मक निर्णय झाला. त्यांनतर विसर्जनाचा तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे शासन आणि न्यायालयाच्या भूमिकेकडे सर्व गणेशभक्तांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, गणेशोत्सवाला नुकताच राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्याने गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनाचा निर्णय स्पष्ट नसल्याने त्याबाबत गणेशभक्त, तसेच मूर्तिकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर न्यायालयाने गुरुवारी ६ फुटांवरील मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास परवानगी दिल्यांनतर गणेश मंडळे आणि मूर्तिकरांमध्ये आनंदाची लाट पसरली.

पीओपी मूर्तींच्या निर्बंधामागे शासनाचा पर्यावरण जपणे हाच मुद्दा होता. मात्र, त्यातूनही आता मार्ग निघाला आहे. विसर्जनाबाबत अनेकांच्या मनात विविध प्रश्न होते. तेही आता दूर झाले आहेत. लोकमान्यांनी सुरू केलेली परंपरा पुढेही उत्साहात सुरू राहणार आहे. या उत्सावामुळे अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे हातावर पोट असणाऱ्यांना आधार मिळाला आहे, अशी भावना मूर्तिकार सतीश वळिवडेकर यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे गणेशभक्तांना आनंद झाला आहे. न्यायालयाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे किरण तावडे यांनी सांगितले.

नैसर्गिक जलस्रोतात मोठ्या गणेशमूर्तीच्या विसर्जनाबाबतचा न्यायालयाचा निर्णय दिलासादायक आहे. मंडळाची मूर्ती २३ फुटांची असते. त्यामुळे मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे अशक्य होते. सुरुवातीला पीओपी मूर्तींवरील बंदीमुळे मूर्तिकार अडचणीत आले होते. बंदी हटविल्यानांतर नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यावर निर्बंध घातल्यानंतर गणेश मंडळे अडचणीत आली होती. त्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आनंद होत असल्याचे परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे विश्वस्त मिनार नाटळकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने फार उशिरा निर्णय दिला आहे. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून अनेक मंडळे पुढील वर्षाच्या उत्सवाची तयारी करतात. अनेक मंडळे पाच ते सहा महिन्यांपासून तयारीला लागतात. त्यामुळे न्यायालयाने लवकर निर्णय देणे अपेक्षित होते, असे मत तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे तेजस शिंदे यांनी व्यक्त केले.