मुंबई : सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शहरातील तापमानात गुरुवारपासून (२३ ऑक्टोबर) दोन ते तीन अंशांनी घट होण्याचा अंदाज खासगी हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सांताक्रूझ येथे सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.

सध्या शहरात दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि दमट हवेमुळे त्रासदायक उकाडा जाणवत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार – शुक्रवार या कालावधीत मुंबईत हलक्या सरींची शक्यता आहे. परिणामी कमाल तापमानात सध्याच्या तापमानापेक्षा २ ते ३ अंशांनी घट होईल, असे खासगी हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईकरांना गुरुवारपासून पुढील दोन दिवस तरी दिलासादायक वातावरण अनुभवता येईल. त्याचबरोबर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी हवेत हलका गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. दिवसभर उन्हाचा चटका मुंबईकरांना नकोसे करुन सोडत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईत ३४ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान तापमानाची नोंद होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३५ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील तापमान १ अंशांनी अधिक नोंदले गेले. सांताक्रूझ येथे सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल रत्नागिरी येथे ३५.५ अंश सेल्सिअस, डहाणू ३४.१ अंश सेल्सिअस, अकोला ३४.४ अंश सेल्सिअस, लोहगाव ३४ अंश सेल्सिअस आणि जळगाव येथे ३४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याची स्थिती काय?

मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागातही तापमानाचा पारा चढा आहे. अनेक भागात ३५-३६ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदले जात आहे. त्यामुळे सध्या राज्यात सर्वदूर उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे.

कमी दाब क्षेत्राची तीव्रता अधिक

अग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप, केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. वायव्येकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता वाढत आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे मंगळवारपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. कमी दाब क्षेत्रापासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.