मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या इमारतीतील काही वर्गांमधील छत कोसळून एक महिना उलटल्यानंतरही डागडुजी करण्यात आलेली नाही. परिणामी, संबंधित इमारतीत वर्गखोल्यांची कमतरता भासत असून विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र देऊन तात्काळ डागडुजी करण्याची मागणी केली आहे.

गेल्या महिन्यात गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या इमारतीमधील काही वर्गांमधील छत कोसळल्याची दुर्घटना घडली होती, मात्र कोणतीही जीवितहानी व नुकसान झाले नाही. या दुर्घटनेनंतर संबंधित ३ वर्ग बंद ठेवण्यात आले. मात्र एक महिना लोटल्यानंतरही वर्गांची डागडुजी करण्यात आलेली नाही. तर सध्या ३ वर्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. यामुळे वर्गांची कमतरता भासत असून नियमित विद्यार्थ्यांना एकाच दिवशी दोन ते तीन सत्रात तासिकांना हजर राहावे लागत आहे. धोकादायक वर्गांची ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबेकर यांनी पाहणी करून गरवारे इमारतीसह मुंबई विद्यापीठाच्या सर्व जीर्ण इमारतींची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी केली आहे.

‘राजकीय मंडळींसाठी कलिना संकुलातील संबंधित जागांची तात्काळ डागडुजी करण्यात येते, मात्र विद्यार्थी शिकत असलेल्या वर्गांकडे दुर्लक्ष होते. हा दुजाभाव का ?‘एमएमआरडीए’कडून विकासाकरिता अधिग्रहित केलेल्या जागेचा मोबदला म्हणून बाराशे कोटी रुपये देण्यात येणार होते. या गोष्टीचा मुंबई विद्यापीठाने पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाकडून पैसे वसूल करून घ्यावेत आणि कलिना संकुलातील सर्व जीर्ण इमारतींची डागडुजी अथवा नव्याने उभारून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा’, असे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाचे म्हणणे काय ?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील गरवारे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्र. ५ मधील छताचे थोडेसे प्लास्टर पडले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कक्ष क्र. ५ सोबत इतर कक्षांमध्ये खराब झालेले प्लास्टर अभियांत्रिकी विभागाकडून पाडण्यात आले आहे. सदर इमारतीमधील तीन कक्षाच्या छताच्या प्लास्टरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन कक्षामधील प्लास्टरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून सदरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.