लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः शिक्षणासाठी एका संस्थेत दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी वारंवार जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समुपदेशनात उघड झाला. याप्रकरणानंतर मानखुर्द पोलीस ठाण्यात विनयभंग व लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी पित्याला अटक केली आहे.
पीडित मुलगी १५ वर्षांची असून तिचे वडील आईला मारहाण करत असल्यामुळे ती घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर आरोपी पिता पीडित मुलीवर वारंवार जबदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता.२०२१ पासून सुरू असलेला या प्रकार पीडित मुलीने कोणालाच सांगितला नाही. पीडित मुलीचे वडील तिचे संगोपन नीट करत नव्हते. त्यामुळे पीडित मुलीला शिक्षणासाठी एका संस्थेत दाखल करण्यात आले.
आणखी वाचा-मुंबई: २५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक
तेथे दाखल करताना तिला विश्वासात घेऊन मुलीचे समुपदेशन केले असता तिच्यावर आरोपी पित्याने वारंवार जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले. याप्रकारानंतर संस्थेने पीडित मुलीवर झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी आरोपी पित्याला अटक करण्यात आली.
