केंद्रीय सेवा नियमाची पायमल्ली केल्याचा नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई, केद्रीय अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर रेस्टॉरंट आणि बारचा परवाना असल्याचा आणखी एक गौप्यस्फोट राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी केला. केंद्रीय सेवेत असताना इतर कोणताही व्यवसाय करता येत नाही, या नियमाची वानखेडे यांनी सरळसरळ पायमल्ली केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना १९९७मध्ये वानखेडे यांच्या नावावर रेस्टॉरंट आणि बारचा परवाना घेतला होता. ३ लाख १७ हजार ६५० रुपये भरून त्यांनी २०२२ पर्यंत त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. वास्तविक पाहता १८ वर्षांखालील कुणालाही  मद्यविक्री किंवा बारचा परवाना दिला जात नाही, असा नियम असताना समीर वानखेडे यांचे वय १७ वर्षे १० महिने १९ दिवस असताना त्यांच्या नावावर  परवाना देण्यात आला होता.   त्याआधारे १९ ९७ पासून आजपर्यंत त्यांचा नवी मुंबईत  बार  सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

‘बदनाम करण्याचा उद्देश’

माझ्या मालकीचा बार असल्याचे छायाचित्र मला बदनाम करण्याच्या उद्देशाने समाज माध्यमांवर प्रसारीत करण्यात आले असून ते छायाचित्र माझ्या बारचे नाही. मी सेवेत असल्यापासून कोणताही व्यवसाय करत नाही, असे वानखेडे म्हणाले.