मुंबई : राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिराच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या कबुतरखान्यामुळे पुन्हा वाद चव्हाट्यावर आला आहे. मंगलप्रभात लोढा यांनी त्या कबुतरखान्याचे अनावरण केल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मराठी एकीकरण समितीनेही या कृत्याचा तीव्र विरोध केला असून संबंधित कबुतरखान्याची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे केली आहे. तसेच, लोढा यांना कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाचा मंत्री म्हणून नेमले आहे. कबुतरखाने सुरू करण्यासाठी नेमलेले नाही, अशी खोचक टीका एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे.

दादर कबुतरखान्याचा वाद पेटलेला असतानाच लोढा यांनी न्यायालयाचा मान ठेऊन कबुतरखान्यांच्या प्रश्न सोडवण्याचे आवाहन पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केले होते. बीकेसी, रेसकोर्स, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यासारख्या मोकळ्या जागांवर कबुतरांना खाद्य घालण्यासाठी सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र म्हणून निश्चित करावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता थेट राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिराच्या जागेवर सोमवारी नवीन कबुतरखाना सुरू करण्यात आला. त्यावरून आता पुन्हा कबुतरखान्याचा वाद पेटला आहे.

दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन समुदायाने हटविल्यानांतर, तसेच त्यांच्याकडून आक्रमकतेची भाषा करण्यात आल्यांनतर मराठी एकीकरण समितीने या प्रकरणात उडी मारली होती. राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखाना सुरू झाल्यांनतर समितीने त्याला तीव्र विरोध केला आहे. याबाबत समितीने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनरक्षकांना पत्र पाठवून प्रकरणाची पर्यावरणीय व कायदेशीर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कबूतरखान्यासाठी आवश्यक परवानग्या कोणकोणत्या विभागाकडून घेतल्या आहेत, याची सविस्तर माहिती द्यावी, ईआयए अहवाल, सार्वजनिक सुनावणीचा अहवाल व वनविभागाची मंजुरी सार्वजनिक करावी, पर्यावरणीय हानी होणार असल्यास संबंधित कबूतरखाना हटवावा किंवा वनक्षेत्राबाहेर स्थलांतरित करावा, भविष्यात राष्ट्रीय उद्यान परिसरात कोणतेही धार्मिक वा अन्य बांधकाम करण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करावे, आदी मागण्या मराठी एकीकरण समितीने केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांना कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाचे मंत्री म्हणून नेमले आहे. लोढा यांना कबुतरखाने सुरू करण्यासाठी नेमले नाही. लोढा यांनी आपल्या विभागाकडे लक्ष द्यावे. पालकमंत्री या नात्याने त्यांनी नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. कबुतरखाने सुरू करून पक्षांना अधू करण्याचा, तसेच त्यांचे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कबुतर त्यांचे पोट स्वतः भरू शकतात. त्यांना दाणे टाकण्याची आवश्यकता नाही, असे गोवर्धन देशमुख यांनी सांगितले. राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिराच्या जागेत सुरू केलेला कबुतरखाना मानवी वस्तीपासून दूर असल्यास हरकत नाही. मात्र, लोढा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.