मर्जीतील ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाद

प्रभागनिहाय शाखा स्थापन करून पक्षाची तळातील बांधणी मजबूत करण्याची काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची योजना काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या राजकीय ‘संन्यास’ घेण्याचे एक कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ब्लॉक अध्यक्ष आपल्या मर्जीतील असला पाहिजे या नेतेमंडळींच्या आग्रहानेच संघर्षांला सुरुवात झाली आणि त्यातूनच कामत यांनी आपली नाराजी उघड केल्याचे समजते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेची प्रत्येक प्रभागांमध्ये चांगली बांधणी आहे. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व कार्यकर्ते अशी शिवसेनेची सर्व प्रभागांमध्ये घट्ट बांधणी आहे. पूर्वाश्रमीच्या शिवसैनिक असलेल्या निरुपम यांनी काँग्रेसमध्ये अशीच बांधणी करण्याची योजना मांडली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक प्रभागामध्ये ब्लॉक अध्यक्ष नेमल्याने संघटना अधिक बळकट होईल, असे निरुपम यांचे गणित आहे. त्यानुसार मुंबई काँग्रेसने ठराव करून प्रस्ताव अ. भा. काँग्रेस समितीकडे पाठविला. दिल्लीने त्याला मंजुरी दिली. यानुसारच सर्व प्रभागांमध्ये अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातूनच वादाला तोंड फुटले. राजकारण संन्यासाची घोषणा गुरुदास कामत यांनी करण्यामागे हेसुद्धा एक कारण असल्याचे समजते.   प्रत्येक प्रभागाचा ब्लॉक अध्यक्ष निवडण्याकरिता निरुपम यांनी माजी खासदार-आमदार व स्थानिक नेत्यांकडून नावांची यादी मागिवली. प्रत्येक नेत्याने आपापल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची नावे पाठविली होती. यानुसार प्रभागनिहाय ब्लॉक अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी माजी खासदार व आमदारांनी वेगवेगळी नावे दिली. काही नेत्यांनी आपल्या विभागातील अध्यक्ष आपल्या पसंतीनुसारच नेमला गेला पाहिजे, असा आग्रह धरला. यातूनच वादाला तोंड फुटल्याचे काँग्रेसच्या सूत्राकडून सांगण्यात आले. आमदार नसिम खान यांच्या चांदिवली आणि माजी आमदार कृपाशंकर सिंग यांच्या कलिना मतदारसंघातील नियुक्त्या करणेच निरुपम यांना अद्याप शक्य झालेले नाही. दोन्ही मतदारसंघांमध्ये माजी खासदार प्रिया दत्त यांनी आपण शिफारस केलेल्या नावांचा विचार करण्याची मागणी केली आहे. तर नसिम खान आणि कृपाशंकर सिंग या दोन्ही ताकदवान नेत्यांनी आपल्या विरोधी गटाची नावे स्वीकारण्यास नकार दिला आहे. यामुळे या दोन्ही मतदारसंघांच्या नेमणूक अद्यापही झालेल्या नाहीत