मुंबई: लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदारयाद्यांचा घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही वाचविण्यासाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निपक्षपणे पार पडाव्यात यासाठी महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी दिली.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्या भेटीची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता सर्वपक्षिय शिष्टमंडळ भेट घेणार आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सर्व नेत्यांची पत्रकार परिषद होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला भेटणे ही औपचारिकता आहे. कारण ते काही करत नाही. तरीही आमचे काही प्रश्न आहेत. आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर मांडव्या लागतील. ही लोकशाही व्यवस्थेने निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे. त्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ चोकलिंगम यांची भेट घेईल. या शिष्टमंडळात प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच हे शिष्टमंडळ विरोधी पक्षाचे किंवा महाविकास आघाडीचे नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनाही पत्र

या शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनाही पत्र पाठविले असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रकियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षिय शिष्टमंडळ चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. या शिष्टामंडळात आपण स्वतः सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी, असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.