शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कामगारांच्या संपात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर हल्लाबोल केलाय. “कामगार समजुतीनं घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

संजय राऊत म्हणाले, “राज्य सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर संपातून तोडगा काढण्यासाठी कामगारांना चांगली आर्थिक मदत मिळावी म्हणून पॅकेज जाहीर केलं. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार कमीतकमी ५,००० रुपये पगारवाढ करणार आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार २४,००० रुपयांपर्यंत जाणार आहे. याची तरतूद राज्य सरकार करणार आहे, तरीही कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ देणारे काही राजकीय विरोधी पक्ष हा संप चिघळवत ठेवणार असतील तर ते हजारो कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं नुकसान करत आहेत.”

“त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”

“त्यांना एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का? राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहोत. मुंबई ही कामगार-शेतकऱ्यांच्या लढ्यातून आम्हाला मिळाली आहे. कष्टकऱ्यांचं नुकसान व्हावं असा विचार आमचं सरकार कधीही करणार नाही. राज्य सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांना आर्थिक मदत देत आहोत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा : केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल होत असल्याचा भाजपाचा आरोप, संजय राऊत म्हणतात दंगलखोर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कामगार समजुतीनं घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले? तुम्ही चर्चा करू शकता, पण ज्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद भुषवलंय त्यांचा कामगारांसमोर, माध्यमांसमोर एकेरी उल्लेख करता. त्यांचं असं काय कर्तुत्व आणि योगदान आहे?” असा सवाल राऊतांनी विचारला.