मुंबई : या दसऱ्याला आपल्याला मुंबईतील रावणाला पाण्यात बुडवायचे आहे आणि दिल्लीतील रावणाला जाळायचे आहे. गद्दारांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गद्दार आज अमित शहा यांचे जोडे, चप्पलांचे पूजन करणार आहेत, अशी जोरदार टिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) दसरा मेळाव्यात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. हे शिवतीर्थ आहे, शिवसेनेची स्थापना याच शिवतीर्थावर झाली. याच्या बाजूला आणखी एक शिवतीर्थ आहे, ते ही आपलेच मानायला हवे, असे म्हणत पुन्हा एकदा ठाकरे बंधूच्या ऐक्याविषयी भाष्य केले. आम्ही आज गद्दारांवर चिखलफेकच करणार आहोत, तीच त्यांची लायकी आहे. आज मराठावाड्यासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे चिखल झाला आहे, लोकं आठ – दहा दिवसांपासून चिखलात आहेत. मग आपण दोन तास चिखलात सभा घेतली तर काही बिघडत नाही. हा आमचा ओला दसरा आहे. या दसऱ्याला मुंबईतील रावणाला बुडवायचा आहे आणि दिल्लीतील रावणाला जाळायचा आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार मत चोरीतून सत्तेवर आले आहे. यांनी आमचा शिवसेना पक्ष चोरला, आमच्या चिन्हांची चोरी केली. यांनी इतकी चोरी केली की, मुंबईतील चोर बाजाराचे नाव, मोदी बाजार करण्याची वेळ आली आहे, अशी टिकाही राऊत यांनी केली.
अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीवरून भाजप सरकारचा समाचार घेतला. अतिवृष्टीमुळे ३३ जिल्ह्यांत हाहाकार उडाला आहे. सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सामान्य माणूस मोठ्या दुखाःत आहे. सरकारला जनतेच्या वेदना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या स्थितीवर बोलण्यास सरकारला तोंड नाही. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर होत आहे. फडणवीस सरकारच्या काळात साडेआठ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तालयात शेतकरी घुसले होते, तसेच शेतकरी आता मंत्रालयात घुसून सरकारला जाब विचारल्या शिवाय राहणार नाहीत. राष्ट्रीय आपत्ती मदत निधीचे (एनडीआरएफ) निकष तोकडे आहेत. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. पण, एनडीआरएच्या निकषांप्रमाणे एका शेतकऱ्याच्या फक्त तीन जनावरांनाच भरपाई मिळणार आहे.
उर्वरीत जनावरांचा लाभ मिळणार नाही. गायीची किंमत एक लाखांवर गेली आहे, पण, मदत फक्त ३७ हजार रुपये मिळणार आहे. सरकारच्या मदतीवर विश्वास नाही. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळालीच पाहिजे. आता बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पंतसंस्थांकडून वाढीव व्याज दराने कर्ज घ्यावे लागत आहे. ऊस उत्पादकांकडून प्रति टन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तरीही भाजप नेत्यांच्या कारखान्यांना सरकारने थकहमी दिली आहे. सरकारवर जादा आर्थिक भार नको, म्हणून एक रुपयात पीकविमा बंद केला. पाचपैकी चार निकष बंद केले. रद्द केलेले निकष पुन्हा लागू करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणांना ४५ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगितले जात आहे. पण, या लाडक्या बहिणीचा नवरा, तिची मुले अडचणीत आहेत.
त्यांना मदत कोण करणार. देवाभाऊ म्हणून शंभर कोटी रुपयांच्या निनावी जाहिराती दिल्या. राज्यातील एक मंत्री नातवाला ८० लाखांची कार भेट देतो. हा काय प्रकार आहे. २०२० मध्ये ओल्या दुष्काळाची मागणी करणारे देवाभाऊ आता ओला दुष्काळ ही संकल्पनाच नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे या सरकारच्या विरोधात ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, पीकविम्यासाठी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीसाठी राज्यभर लढा उभा करणार आहोत, अशा घोषणाही अंबादास दानवे यांनी केला. मेळाव्याच्या सुरुवातीला नितीन बानुगडे पाटील यांनी तडाखेबाज भाषण करून शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे अवाहान केले.