मुंबई: मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीतरी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही मित्र पक्षांना अडचणीत येणारी कोणतीही भूमिका घेणार नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असून आम्हाला मुंबई अदानीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने मुंबईवरील संकटाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त करीत महापालिका निवडणुकीत काँग्रेसने काेणताही वेगळा विचार करू नये ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मनधरणी केली.
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले होते. जगताप यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका दिवसाच्या प्रसिद्धीसाठी ही वाक्य असतात. मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती. मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व पक्ष मतभेद विसरून एकत्र आले होते. आता पुन्हा एकदा त्याचप्रकारची संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे वातावरण मुंबईत आहे, असे सांगतानाच बिहारमध्ये काँग्रेस आणि तेजस्वी यादव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत. निवडणुका जवळ आल्या तरी त्यांच्यात वाद सुरू आहेत. मग तेथे उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे आहेत काय, असा सवाल करत आम्हाला हेही नको, आम्हाला तेही नको, असे करून चालत नाही. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, ही अत्यंत निकराची लढाई आहे, हे आमच्या सहकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
मुंबईत काँग्रेसचाच महापौर होईल, या भाई जगताप यांच्या भूमिकेवर राऊत म्हणाले, आम्हाला तर काँग्रेसचा पंतप्रधानच करायचा होता. पण होऊ शकला नाही. आम्ही इंडिया ब्लॉक निर्माण केला, तेव्हा आम्हाला राहुल गांधींना पंतप्रधान करायचे होते. त्यावेळी आम्ही असे म्हणालो नाही की, शिवसेनेचा करायचा आहे की अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौराबद्दल काय घेऊन बसलात, तुम्ही २७ महानगरपालिकेचे महापौर काँग्रेसचे करा. आम्हाला काही अडचण नाही. भारतीय जनता पक्षाला रोखणे ही आमची भूमिका आहे. महापौर हा मराठी मातीतला होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे स्पष्ट करत अनेकदा आम्ही काँग्रेसचे देखील सहकार्य घेतले हे आम्हाला विसरता येणार नाही, असेही राऊत म्हणाले.
