मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूकीतून बक्कम नफा मिळविण्याचे आमिष दाखवून मालाडमधील एका ज्येष्ठ नागरिकाची सव्वा कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उत्तर सायबर विभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ७७ वर्षांचे असून मालाड येथे राहतात. मे महिन्यात त्यांना अज्ञात व्यक्तीकडून गुंतवणूकीच्या एका व्हॉटस ॲप समूहात सामिल करण्यात आले होते. या समूहात शंभर सदस्य होते. ते सर्व जण समूहात गुंतवणूकीसंदर्भात चर्चा करीत होते. या समूहाच्या ॲडमिन आराध्या मिश्रा नामक महिलेने तक्रारदाराला फोन केला आणि शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगितले. तिच्या भूलथापांना बळी पडून तक्रारदार गुंतवणूकीसाठी तयार झाले. त्यावेळी त्यांना एक लिंक पाठविण्यात आली आणि त्याद्वारे त्यांनी एससी-एलाईट नावाचे एक ॲप्लिकेशन डाऊनलोड केले. या ॲपमध्ये त्यांनी आपली वैयक्तिक आणि बॅंक खात्यांची माहिती भरली. त्यानंतर या लिंकद्वारे विविध बॅंक खात्यात १ कोटी ३६ लाख ९४ हजार रुपये भरले होते. या रकमेवर त्यांना मिळालेला नफा ॲपवर दाखविण्यात येत होता. त्यामुळे अधिक नफ्याच्या हव्यासापोटी ते पैसे भरत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तक्रारदाराला पुन्हा वेगवेगळ्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास ३०० टक्के नफा मिळेल असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी यापूर्वी भरलेली रक्कम काढण्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना या रकमेवर १० टक्के म्हणजे ७० लाख ८७ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. तक्रारदाराकडे तेवढे पैसे नसल्याने किमान निम्मे पैसे भरले तर पुढील पैसे काढता येतील असे सांगण्यात आले. मात्र तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी सायबर पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार दाखल केली. ५ मे ते २१ जून या कालावधीत त्यांची १ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी उत्तर सायबर विभाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.