मुंबई : ऑनलाईनवरून दीड हजार रुपयांचा ड्रेस घेणे एका ज्येष्ठ नागरिक महिलेला चांगलेच महागात पडले. हा ड्रेस न आवडल्याने तो परत करण्यासाठी तिने कंपनीशी संपर्क साधण्यासाठी गुगलवर शोध घेतला असता सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकली. तिची फसवणूक करून तिच्या बॅंक खात्यातील ९० हजार रुपये लंपास करण्यात आल्याचे उघडकीस आले.
फिर्यादी या ७१ वर्षांच्या असून वांद्रे येथे राहतात. त्यांनी एका ॲपवरून ऑनलाइन शॉपिंग करून दीड हजारांचा एक ड्रेस विकत घेतला. मात्र हा ड्रेस त्यांना आवडला नाही. त्यासाठी २२ जून रोजी त्यांनी गुगलवरून कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राचा (कस्टमर केअर) क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर फोन केला असता साहिलकुमार नामक व्यक्तीशी संपर्क झाला. फिर्यादींनी ड्रेस आवडला नसून तो परत करून परतावा (रिफंड) देण्याबाबत सांगितले. त्याने परताव्या बाबत पुन्हा फोन येईल असे सांगितले. काही वेळानंतर फिर्यादींना एका अनोळखी क्रमांकावरून अमित मिश्रा नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने फिर्यादींना गुगल पे ॲप ओपन करायला सांगून काही माहिती भरण्यास सांगितली. त्यानुसार या फिर्यादीने माहिती भरली. पंरंतु काही वेळेतच त्यांच्या खात्यातील ९० हजारांची रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज आला.
फिर्यादींनी हा प्रकार आपल्या मुलीला सांगितला. मुलीने त्या मोबाइल क्रमांकावर फोन करून विचारणा केली. मात्र समोरील व्यक्तीने त्यांना ठार मारण्याची, तसेच मुंबईत काम करीत असलेली इमारत उडवून टाकू, अशी धमकी दिली. या फसवणूक प्रकरणी फिर्यादीने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वांद्रे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क), ६६ (ड), ३१८ (४), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.