मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच बँकांच्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार विक्रीने सोमवारी भांडवली बाजारात निर्देशांक तीव्र रूपात घसरून, तीन महिन्यांच्या नीचांकावर स्थिरावले. निफ्टी एक टक्क्याहून अधिक घसरून २४,००० च्या खाली बंद झाला, तर सेन्सेक्स ९४२ अंशांनी गडगडला.

मंगळवारी (५ नोव्हेंबर) होत असलेल्या मतदानातून, अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कौल कोणाला मिळेल याबाबतची संदिग्धता, तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने सुरू केलेल्या व्याजदर कपातीच्या चक्राचे भवितव्य तसेच चीनकडून अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देण्यासाठी नवीन प्रोत्साहन योजनेचे स्वरूप या अनिश्चित घटकांनी स्थानिक बाजारात अस्थिरतेला खतपाणी दिले. परिणामी दिवसाच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स ९४१.८८ अंशांनी (१.१८ टक्के) घसरून  ७८,७८२.२४ वर स्थिरावला.

हेही वाचा >>>Vulgar Dance In Election Campaign : मंगेश कुडाळकरांच्या प्रचारात अश्लील नाच, व्हायरल व्हिडीओवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केला ‘हा’ आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवसभरात हा निर्देशांक १,४९१.५२ अंशांनी म्हणजे जवळपास २ टक्क्यांनी आपटताना दिसला होता, पण उत्तरार्धात तो त्या पातळीवरून काहीसा सावरला. तरी चालू वर्षातील ६ ऑगस्टनंतरचा त्याचा हा सर्वात नीचांकी बंद स्तर आहे. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक ३०९ अंशांनी (१.२७ टक्के) नुकसानीसह गत तीन महिन्यांत पहिल्यांदाच २४ हजारांखाली घसरून, २३,९९५.३५ वर बंद झाला. परकीय गुंतवणूकदारांकडून अथकपणे सुरू असलेल्या विक्रीमुळे एकंदर बाजारात नकारात्मक भावना बळावल्या आहेत. जगात इतरत्र उलट चित्र होते. आशियाई बाजारात उत्साही वातावरणाने, सोल, शांघाय आणि हाँगकाँग हे प्रमुख निर्देशांक उच्च पातळीवर स्थिरावले. शुक्रवारच्या अमेरिकी बाजारानेही सकारात्मक क्षेत्रात बंद नोंदवला होता.