मुंबई: गाजलेल्या सिनेमांची दृश्य वापरून समाजमाध्यमांवर रिल्स, जाहिराती बनवून कोट्यवधी रुपयांची कमाई केली जात आहे. या ‘हेराफेरी’ विरोधात सिनेमांचे स्वामित्व हक्क असेलल्या शेमारू या कंपनीने अशी ‘गोलमाल’ करणाऱ्या दोन कंपन्यांविरोधात तक्रार केली होती. न्यायालयाच्या निर्देशनानुसार अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी या दोन्ही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शेमारू एन्टरटेन्मेंनट कंपनी मनोरंजन क्षेत्रातील सामग्री निर्मिती, संकलन आणि वितरणाचे काम करते. कंपनीचे कार्यालय अंधेरी येथे आहे. कंपनीकडे एक विशेष निरीक्षण विभाग आहे. हा विभाग समाज माध्यम (सोशल मीडिया) वृत्तवाहिन्या (न्यूज चॅनेल), यूट्यूब आणि इतर मनोरंजन माध्यमांवर त्यांच्या मालकीच्या सामग्रीचा अनधिकृत वापर होतो का यावर लक्ष ठेवतो.

चित्रपटतील दृश्यांचा रिल्स, जाहिरातींसाठी वापर

या निरीक्षणादरम्यान, कंपनीला आढळले की बंगळुरू मधील एका खासगी ई-कॉमर्स कंपनीने ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘गोलमाल ३’ या चित्रपटांमधील लघुक्लिप्स (शॉर्ट क्लिप्स) वापरून रील्स आणि जाहिराती तयार केल्या आणि त्या त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर मार्केटिंगसाठी पोस्ट केल्या. अशाच प्रकारे, रिअल इस्टेट सेवा देणार्या या अन्य एका कंपनीनेही असा प्रकार केला होता. या कंपनीने ‘फिर हेरा फेरी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘जब वी मेट’ आणि ‘गोलमाल’ या चित्रपटांतील लघुक्लिप्स वापरून रील्स व मीम्स तयार केले आणि त्या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्या, असा आरोप शेमारूने केला आहे.

कंपन्यांनी नोटीसही फेटाळली

या चित्रपटांचे स्वामित्व हक्क शेमारूकडेच आहेत. मार्च २०२४ मध्ये शेमारूने यासंदर्भात दोन्ही कंपन्यांना नोटीस पाठवली होती. मात्र कंपनीने हे आरोप फेटाळून लावत सांगितले की, या क्लिप्सचा आर्थिक फायद्यासाठी वापर करण्यात आलेला नाही. दुसर्या कंपनीने उत्तरही दिले नाही आणि नोटीस फेटाळली. याबाबत शेमारूचे उपव्यवस्थापक विनायक जाधव (वय ५२) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, शेमारूने अंधेरी न्यायालयातही धाव घेतली होती. न्यायालयाने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही कंपन्यांविरोधात कारवाई केली.

दोन्ही कंपन्यांवर गुन्हे दाखल

दोन्ही कंपन्यांवरप्रताधिकार (कॉपीराइट) कायदा कलम ६३ कॉपीराइटचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॉपीराइट कायदा कलम ६३, ६९, फसवणूक केल्याप्करणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (३), सामूहिक कट (३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.