राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा म्हणून एकीकडं वेगवान हालचाली होत असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, “ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं अशी मागणी केली आहे,” अशी माहिती राऊत यांनी दिली.
भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून चर्चा रखडली आहे. दोन्ही पक्षांचे नेते माध्यमातूनच एकमेकाशी बोलत असून, ही कोंडी कधी फुटणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आपण राज्यपालांची भेट घेणार असल्याचं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संजय राऊत यांनी पक्षाचे नेते रामदास कदम यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल भवनात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो. ही केवळ सदिच्छा भेट होती. त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भेट घेऊन आम्ही राज्यपालांना बाळासाहेब ठाकरे यांचं फटकारे आणि उद्धव ठाकरे यांची दोन पुस्तके भेट दिली. त्यांनी दोन्ही पुस्तकांचं कौतुक केलं. एका अमर्यादेत राहुनच आमच्यात चर्चा झाली. खुप दिवसांनंतर राज्याला कायद्याची आणि राजकारणाची जाण असलेले राज्यपाल भेटले आहेत,” असं ते म्हणाले.
शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी बोलावण्याची मागणी केली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, “ही अराजकीय जागा आहे. राज्यपाल हे तटस्थ असतात. त्यामुळं ते त्यांचा निर्णय घेतील. आम्ही फक्त आमची भूमिका मांडली आहे. राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली असून, शिवसेना सरकार स्थापनेत अडथळा ठरत नाही. लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं,” अशी भूमिका आम्ही राज्यपालांकडं मांडल्याचं राऊत म्हणाले.
