आयात मनसे कार्यकत्यांना पदं देण्यापेक्षा राज ठाकरेंनाच पक्षात घ्या, नाराज शिवसैनिकांचा पक्षाला घरचा आहेर

नाराज शिवसैनिकांची पोस्टरबाजी

मुंबईच्या घाटकोपर परिसरात शिवसैनिकांनी पोस्टरबाजी करत आपला रोष व्क्त केला आहे.
ईशान्य मुंबई विभागातील घाटकोपर परिसरात शिवसैनिकांमधली धुसफूस समोर आलेली आहे. मनसेच्या आयात कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना पद देण्यापेक्षा थेट राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही? असा सवाल स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षनेतृत्वाला विचारला आहे. घाटकोपरमध्ये ‘नवनिर्माण शिवसेना’ असं नाव देऊन नाराज शिवसैनिकांनी पोस्टर लावलेली आहेत.

अवश्य वाचा – भाजपकडून सेनेवर युतीसाठी दबाव

यानिमीत्ताने राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धुसफूस समोर आलेली आहे. विशेषकरुन ईशान्य मुंबईत मनसेतून शिवसेनेत आलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष नेतृत्वाने विभागप्रमुखापासून, विधानसभा संघटक अशी पद बहाल केली आहेत. अशा आयात उमेदवारांची यादी पोस्टरवर लावत शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

घाटकोपर परिसरात नाराज शिवसैनिकांकडून अशी पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे

पक्षाला निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज नसून, आयात उमेदवारांना सर्रास पदं वाटली जात आहेत. त्यामुळे आपणही चार पक्षांत जाऊन येऊया असं म्हणत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे. घाटकोपर पश्चिममधील शाखा क्रमांक १२९ च्या बाहेर काही दिवसांपूर्वी शिवसैनिक आपापसांत भिडले होते. नवीन नियुक्त्यांनुसार शिवाजी कदम यांना शाखाप्रमुखाचं पद बहाल करण्यात आलंय. मात्र कदम यांचं वय ६५ वर्ष असल्यामुळे आणि त्यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेत प्रवेश घेतला असल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली होती. याच नाराजीतून प्रदीप मांडवकर आणि शिवाजी कदम यांच्या गटात भांडण झालं होतं. त्यामुळे आपल्या नाराज शिवसैनिकांची पक्ष नेतृत्व कशी समजूत काढतंय हे पहावं लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena leadership face wrath of supporters as all the important positions given to outsiders in mumbai