मुंबई : काही लोक आणि काही राजकीय पक्ष स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे का समजत आहेत? कायद्यापुढे सगळे समान, मग हा तमाशा का, असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिल़े  दुसरीकडे, फडणवीस यांच्याकडून माहिती घेण्यात पोलिसांनी काहीही चुकीचे केलेले नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल़े

‘‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पाहण्यात काही तरी दोष निर्माण झाला आहे. संजय राऊत शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटेपणाने कारवाया करतात याचे पितळ उघडे पाडण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या. पुराव्यासह माहिती जाहीर केली. त्यामुळे इतकेही खोटे बोलू नका’’ अशी टीका संजय राऊत यांनी केली़  महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधींना केंद्रीय तपास यंत्रणांनी राजकीय सूडापोटी चौकशीला बोलावले आणि ते हजर झाले. कायद्यापुढे सगळे समान असतात. मग हा तमाशा का, असा बोचरा सवालही राऊत यांनी भाजपला केला. 

अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही भाजपवर राजकीय भांडवल करत असल्याची टीका केली. प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करायचे भाजपने ठरवले आहे. त्रास देण्यासाठी, अटक करण्यासाठी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाचा पुरेपूर उपयोग ते करतात. आपण मात्र साधे पोलीस चौकशीलाही जायचे नाही आणि तिकडे मात्र वाटेल तसे आरोप करायचे, असा दुटप्पीपणा सुरू असल्याची टीका भुजबळ यांनी केली.

 ‘‘मी कुठल्याही न्याय प्रक्रियेवर किंवा पोलीस प्रक्रियेवर काही बोलत नाही. भाजपची आरोप करण्याची सवय आहे. आम्ही त्यावर उत्तर देत नाही. आम्ही काम करतो. केंद्र सरकार ज्याप्रकारे यंत्रणांचा वापर करते तसे आम्ही कुठल्याही यंत्रणेला प्रचार यंत्रणा म्हणून वापरत नाही. जी काही न्याय प्रक्रिया असते ती आम्ही पुढे नेत असतो. नैराश्य आल्याने भाजप अशाप्रकारे वागत आहे’’, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

फडणवीसांकडून माहिती घेण्यात गैर नाही- गृहमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक नव्हे तर सहावेळा नोटीस पाठवण्यात आल्या. फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नाही. नोटीस म्हणजे समन्स नव्हे. फडणवीसांकडे काही माहिती आहे. ती माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस गेले आहेत. तसेच एसआयटीच्या कार्यालयातून काही गोपनीय पत्रे आणि तांत्रिक माहिती बाहेर गेली आहे. त्यामुळे त्याची माहिती घेण्यासाठी त्यांचा जबाब नोंदवला जात आहे. त्यात गैर काही नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणात एकूण २४ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.  फडणवीस यांची साक्ष बाकी होती. त्यांना काही प्रश्नावली पाठवली होती. त्यांच्याकडून प्रश्नावलीची उत्तरे आली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी त्यांचा जबाब घेण्याचा निर्णय घेतल्याचे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.