युतीच्या चर्चेची पहिली फेरी आज; दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई व ठाणे कोणाचे हा कळीचा मुद्दा राहणार असून शिवसेना व भाजप यांच्यामध्ये युतीसाठी सोमवारी चर्चेची पहिली फेरी होणार आहे. परंतु दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची जय्यत तयारी या वेळी केली असून शिवसेनेच्या सैनिकांचा ‘सामना’ करण्यासाठी भाजपच्या ‘मावळ्यां’ना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे युतीच्या घटस्फोटाच्या अर्जावर पहिली सही कोण करणार, एवढाच प्रश्न शिल्लक राहिल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्षांची स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा असली, तरी पुरेशी तयारी नव्हती. आता दहा महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठी दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली असून पारदर्शकता आणि आमच्या ‘अजेंडय़ा’वरच युती होईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडल्यामुळे शिवसेना कमीपणा घेऊन युती करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजेंडा आमचाच असेल, असे स्पष्ट केले. तर गुंडा-पुंडांना घेऊन मावळे तयार होत नसतात असा जोरदार टोला परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुठीत काठी धरणारे आणि तलवारीची मूठ पकडणारे यांच्यातील फरक आगामी निवडणुकीत कळेलच, असेही रावते म्हणाले. मुळात शिवसेना-भाजप ही युती हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर झाली होती. तोच आमचा अजेंडा होता. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही संघाचा हिंदुत्व हाच अजेंडा असल्याचे स्पष्ट केले आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची मशाल पेटवल्यानंतर त्याचा फायदा भाजपलाही झाला होता हे त्यांनी विसरू नये. आता काँग्रेस-राष्ट्रवादीमधील गुंडापुडांना घेऊन सत्तेचा सोपान चढण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी एकदा संघाच्या कार्यकर्त्यांना काय वाटते, तसेच आजपर्यंत भाजपसाठी खस्ता खाल्लेल्या कार्यकर्त्यांची भावना तपासून पाहावी, असे सांगत असले  ‘मावळे’ घेऊन शिवसेनेच्या सैनिकांशी लढणे तर दूरच समोर उभेही राहता येणार नाही, असे रावते यांनी सुनावले.

कालपर्यंत ‘नमस्ते सदावत्सले’ म्हणणारे आणि हिंदुत्वाची आरती गाणाऱ्यांना आता एकदम उठता-बसता छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण कशी काय येऊ लागली, असा सवालही सेनेच्या एका नेत्याने केला. महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले असून मुंबईकरही दुधखुळे नाहीत, असा टोला या नेत्याने लगावला.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीच अगतिक होत युतीची चर्चा लवकर सुरू करा, अशी विनवणी केल्यामुळेच आम्ही चर्चेसाठी तयार झाल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.

  • मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलेले असल्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत पारदर्शकतेचा मुद्दा आणि भाजपचाच अजेंडा राहील. या मुद्दय़ावर तडजोड होणार नाही, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. तर शिवसेनेनेही ताठर भूमिका घेतली आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena vs bjp in bmc election
First published on: 16-01-2017 at 02:08 IST