मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १७ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी याकरीता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केले आहेत. निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी हे अर्ज आले आहेत.

महायुतीतील घटक पक्षांनी मैदान आरक्षित करून इतर पक्षांची अडवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नसून याबाबत सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस उरले असून प्रचाराला वेग आला आहे. राजकीय वातावरणही तापले आहे. येत्या काही दिवसात मुंबईत राजकीय पक्षांतील मोठ्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार आहे. सभांच्या आयोजनासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे गेल्याच महिन्यात अर्ज केले आहेत. मात्र १७ नोव्हेंबर रोजी सभेसाठी अद्याप परवानगीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर सभा किंवा कार्यक्रम घेण्यासाठी मैदान आरक्षित करण्याकरीता सर्वोच्च न्यायालयाने ४५ दिवसांची मर्यादा घालून दिली आहे. ही मर्यादा संपली असून १७ नोव्हेंबर रोजी मैदान देता येणार नसल्याचे समजते. मात्र महायुतीतील घटक पक्षांनी मैदान आरक्षित करून केवळ अडवून ठेवल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

हेही वाचा – Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा

महायुतीतील तीनह पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी १०, १२ व १४ नोव्हेंबरसाठी परवानगी मागितली आहे. मात्र १० आणि १२ नोव्हेंबर रोजी सभा होईल की नाही माहीत नाही. मात्र महायुतीची एकच सभा १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे केवळ मैदान अडवून राजकीय कुरघोडी करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. मनसेने सर्वात आधी अर्ज केला होता. त्यामुळे १० नोव्हेंबर रोजी सभा न झाल्यामुळे एक दिवस रिक्त आहे तो आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले. तसे न झाल्यास लोकशाहीमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशाही इशारा त्यांनी दिला.

आचारसंहितेच्या काळात सर्व राजकीय पक्षांना प्रचार सभा घेण्यासाठी समान संधी मिळणे आवश्यक आहे. महायुतीतील घटक पक्ष सत्तेच्या जोरावर अशी कुरघोडी करत असतील तर निवडणूक आयोगाने याबाबत हस्तक्षेप करायला हवा. – यशवंत किल्लेदार, विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना</p>

हेही वाचा – माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आणि प्रचार सभा

१७ नोव्हेंबर हा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिनही आहे. शिवसैनिकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी मैदानावर शिवसैनिकांची मोठी रिघ लागलेली असते. त्यामुळे १७ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह, शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन पक्षांनीही अर्ज केले आहेत. या दिवशी सभेसाठी हे मैदान मिळावे यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत.