मुंबई : खासदार संजय राऊत यांचा भारतात नेपाळप्रमाणे हिंसाचार घडविण्याचा कट असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे) केली आहे. या मागणीसाठी गुरूवारी शिवसनेचे (शिंदे) नेते, माजी खासदार संजय निरूपम यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन पत्र दिले.
सध्या नेपाळमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. त्याचे राजकीय पडसात भारतात देखील उमटू लागले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत हे सातत्याने देशविघातक वक्तव्य करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात आला आहे. संजय राऊत समाजमाध्यमावरून विखारी वक्तव्य करून जनभावना भडकविण्याचे काम करीत आहेत.
नेपाळप्रमाणे भारतातही हिंसाचार घडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप संजय निरूपम यांनी केला आहे. यापूर्वी बांगलादेश आणि श्रीलंकेतील हिंसाचाराचा भारताशी संबंध जोडून राऊत यांनी देशविघातक वक्तव्ये केली होती. राऊत यांची भूमिका संविधान आणि लोकशाही विरोधात आहे, असाही आरोप निरूपम यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपायुक्तांना पत्र

संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वर्सोवा पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांना निवेदन देण्यात आले. वारंवार देशविरोधी भाष्य करणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.