मुंबई : सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीजबिल देयकांमध्ये तब्बल १ कोटी २९ लाख ९५ हजार रुपयांच्या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी सुरू आहे. यामध्ये दोषी आढळून आल्यास आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. सदाभाऊ खोत यांनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. प्रसाद लाड, परिणय फुके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
महावितरणकडे महापालिकेने ९ कोटी ८८ लाख ६६ हजार १३३ रुपयांचा धनादेश दिला, मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे वीजबिल केवळ ८ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये होते. उर्वरित रक्कम खासगी ग्राहकांच्या वीजबिलापोटी भरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींची नावे निश्चित झाली आहेत. तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. या पथकात पोलिस निरीक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश होता. मात्र, तपासादरम्यान साबळे स्वतः लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आणि त्यांनी ज्या प्रकरणात लाच घेतली, त्याचा संबंध सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त झाला आहे, असेही भोयर म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, एक महिन्याच्या आत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. चौकशी दरम्यान खासगी ग्राहकांचे वीजबिल महापालिकेच्या निधीतून भरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात महापालिकेतील तसेच बँकेतील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय एसआयटी चौकशीत व्यक्त करण्यात आला असल्याचेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. या प्रकरणात आयुक्त शुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सर्व संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही भोयर म्हणाले.