मुंबई : दुबईतून प्रत्यार्पित करण्यात आलेला अमली पदार्थाच्या टोळीचा माफिया सलीम शेख याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. शेखने अनेक सेलिब्रेटींना अमली पदार्थ पुरविल्याचा दावा केला असून त्याने चौकशीत नावे उघड झालेल्या सर्व सेलिब्रेटी आणि राजकारण्यांची चौकशी केली जाणार आहे.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात अमली पदार्थांचा सूत्रधार मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला नुकतेच संयुक्त अरब अमिरातीमधून (युएई) प्रत्यार्पण करून भारतात आणले. हे संपूर्ण प्रकरण अडीच कोटींच्या अमली पदार्थांचे असून शेखने भारतात अमली पदार्थांच्या विक्रीचे जाळे तयार केले होते. याप्रकरणी गुन्हे शाखा २ च्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून या पथकात अंमली पदार्थ विरोधी कक्षातील दोन आणि गुन्हे शाखेतील दोन अशा एकूण चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आरोपी मोहम्मद सुहेल शेखने हिंदी सिनेसृष्टीतील (बॉलीवूड) अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते यांच्यासाठी देशात आणि विदेशात अमली पदार्थांच्या मेजवान्या (पार्टी) आयोजित केल्याचा खुलासा पोलिस चौकशीत केला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता दिग्दर्शक अब्बास- मस्तान, माजी आमदार झिशान सिद्दीकी, अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही, समाजमाध्यम प्रभावक ओरी उर्फ ओरहान, दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, रॅपर लोका आदींची नावे चौकशीत समोर आली होती. मुंबई, गोवा तसेच परेदशातील दुबई या ठिकाणी या अमली पदार्थांच्या मेजवान्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्याने दिली. यापैकी अनेकांनी समाज माध्यमावरून या आरोपांचा इन्कार केला. मात्र या सर्वांची चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

एमडीमधील सर्वात मोठी कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी एकूण २५२ कोटी २८ लाख रुपयांचे १२६.१४ किलो मेफेड्रोन, रोख ३ कोटी ६२ लाख रुपये जप्त केले. जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे २५६ कोटी ४९ लाख इतके आहे. आतापर्यंत सांगली, सुरत आणि मुंबईतील प्रमुख सूत्रधार, तसेच एका महिलेसह १५ जणांना अटक करण्यात आली. राज्याच्या इतिहासातील मॅफेड्रोनच्या सर्वात मोठ्या जप्तीपैकी ही एक कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.