मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारती, संक्रमण शिबीर आणि तेथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या सोयीसाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आवश्यक ती मदत मिळावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे. हा कक्ष १ जून ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कार्यान्वित राहणार आहे.

पावसाळ्यात मुंबईतील झोपु योजनेतील इमारती वा संक्रमक शिबीरातील इमारत कोसळण्याच्या वा आपत्कालीन घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत रहिवाशांना तात्काळ आवश्यक ती मदत मिळावी यासाठी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात येतो. त्यानुसार यंदाही या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती झोपु प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली. झोपु प्राधिकरणाच्या मुख्यालयात १ जून ते ११ नोव्हेंबर दरम्यान हा कक्ष कार्यान्वित राहील.

हेही वाचा…नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ५८ हजार अर्ज

झोपु प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले सहायक अभियंता आणि दुय्यम अभियंता यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार आहे. या कक्षाशी संपर्क साधून रहिवाशांना संकटकाळी आवश्यक ती मदत मिळविता येणार आहे. या कक्षाशी संपर्क साधण्यासाठी लवकरच झोपु प्राधिकरणाकडून भ्रमणध्वनी क्रमांक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.