मुंबई : गूढता, गुंतागुंत आणि हास्याने भरलेल्या ‘स्मार्ट सूनबाई’ या नवीन मराठी चित्रपटाच्या टीझरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चित्रपटाच्या संकल्पनेचे, कलाकारांचे, तसेच दिग्दर्शकाच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले. तसेच टीझरमधील भावनिक आणि विनोदी प्रसंगांचा संगम पाहून ‘हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच राज्य करेल’, असा विश्वास व्यक्त केला.

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित, गोवर्धन दोलताडे व गार्गी निर्मित आणि कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित ‘स्मार्ट सूनबाई’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. एका अनोख्या, रंजक आणि गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणारा ‘स्मार्ट सूनबाई’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. रहस्याचा थर आणि प्रेमाचा स्पर्श असणारी शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी टीझरमध्ये पाहायला मिळत असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा टीझर प्रेक्षकांना एका अप्रतिम स्थळावर घेऊन जातो. सुंदर, रमणीय आणि निसर्गरम्य ठिकाणी चित्रित झालेला हा चित्रपट भावनांचा, हास्याचा आणि प्रेमाचा परिपूर्ण संगम आहे. शहरातील आधुनिक स्त्रिया आणि गावातील पारंपरिक स्त्रिया यांची मजेशीर जुगलबंदी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना हसवणार, गुदगुल्या करणार आणि शेवटी थोडे विचार करायलाही भाग पाडणार आहे.

‘स्मार्ट सूनबाई’ चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत व लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, मोहन जोशी, दीपक शिर्के, अंशुमन विचारे, प्राजक्ता हनमघर, स्नेहल शिदम, उषा नाईक आदींचा समावेश आहे. या सर्व कलाकारांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे चित्रपट रंजक ठरणार आहे. या चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी केले आहे. गीतकार वैभव देशमुख, अदिती द्रविड असून अजय गोगावले, वैशाली माडे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र, उर्मिला धनगर यांचे स्वर गाण्यांना लाभले आहेत. तर ही गीते विजय नारायण गवंडे, साई – पियुष यांनी संगीतबद्ध केली आहे. रहस्य, हास्य आणि भावबंधांचा मेळ साधणारा ‘स्मार्ट सुनबाई’ हा चित्रपट परिपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार असून २१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.