मुंबई : दुष्काळ, पूरासारख्या आपत्तींची कुऱ्हाड कोसळल्यानंतर हतबल होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्यांची वारंवारता गेल्या काही वर्षांत वाढली आहे. मरण कवटाळून शेतकरी जगण्यापासून आपली सुटका करून घेतो, मात्र त्याच्या मागे राहिलेल्या कुटुंबाची होणारी वाताहत कल्पनेच्या पलीकडची असते. त्यांच्याविषयी कणव वाटून आपण चुकचुकतो खरे, आणि दुसऱ्याच क्षणी आपल्या दिनक्रमात व्यग्र होऊन जातो, पण अशा काही सहृदय व्यक्ती असतात, की जे अशा अनाथ लेकरांसाठी आपला दिनक्रमच काय, आपले पूर्ण जीवन त्यांना वाहून घेतात. आयटी क्षेत्रात उच्च पदावर काम करणारा अशोक देशमाने हा असाच एक सामाजिक जाणिवेने झपाटलेला युवक. ज्याने सुरुवातीला नोकरी सांभाळीत जमेल तितक्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आसरा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिक वेळ द्यायला हवा, हे लक्षात आल्यानंतर अशोक देशमाने या युवकाने बड्या वेतनाच्या नोकरीवर पाणी सोडत या लहानग्यांना हक्काचे छप्पर मिळण्यासाठी झटू लागला आणि यातूनच उभारले गेले आहे आळंदीनजिकचे ‘स्नेहवन’.

एक दशकभराचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आज आळंदीतील स्नेहवन येथे २०० मुलांचा सांभाळ केला जातो. गेल्या दशकात यातील काही मुल शिकून मोठी झाली व स्वत:च्या पायावरही उभी राहिली आहेत. यातील काही एमएससी तर काही पदवीधर झाले.अनेकांनी बारावी उत्तीर्ण केली असून ते पुढील शिक्षण घेत आहेत. २०१५ मध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणाऱ्या अशोक देशमाने यांना खरी साथ दिली त्यांच्या पत्नी अर्चना यांनी. आज ७० मुलांची आई बनून अर्चना स्हेहवनात राबते आहे. अशोक देशमाने या तरुणाने स्वामी विवेकानंद व बाबा आमटे यांच्या कार्यापासुन प्रेरणा घेवून आयटीतील गलेगठ्ठ पगाराची नोकरी वयाच्या २५ व्या वर्षी सोडून आत्महत्या ग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार यांच्या मुलांच्या शैक्षणीक पुनर्वसन व संगोपनासाठी ‘स्नेहवन’ नावाचा सामाजिक प्रकल्प पुण्यात चालू केला. लग्नाअगोदर नोकरी सोडल्यामुळे या तरुणांशी लग्न करायला कोणतीही मुलगी तयार होत नव्हती. लग्नाअगोदर वीस लेकरांचा बाप झालेला मुलासोबत कोण लग्न करेल हा प्रश्नच होता. परंतु अर्चनाने लग्न केले तेही सर्वकाही समजून. आजकालच्या मुली जिथे सासू- सासरेही नको म्हणतात, तेथे अर्चनान आज हा मोठा संसार आनंदाने करत आहे.

आळंदीतील या प्रकल्पात आज तीन इमारती उभ्या असून यात १०० मुलांचे व १०० मुलींसाठी वसतीगृह उभे करण्यात आले आहे. आजघडीला ७० मुल या ठिकाणी राहात असून १३० मुले ही आजुबाजूच्या परिसरातील गरीब तसेच आदिवासी समाजातील असून त्यांच्या शिक्षणाचा भार ‘स्नेहवन’ने उचलला असल्याचे देशमाने यांनी सांगितले. याचबरोबर परिसरातील गावांमधील कष्टकरी व मजुरांसाठी फिरता दवाखानाही सुरु करण्यात आला असून संस्थेच्या या कामाची दखल घेत डॉ रघुनाथ माशेलकर, डॉ विकास आमटे, डॉ रविंद्र कोले, डॉ अशोक कुकडे तसेच अनेक सनदी अधिकाऱ्यांनी संस्थेला आवर्जून भेटी दिल्या आहेत. हा सारा पसारा सांभाळण्यासाठी येणारा खर्चही मोठा आहे. जवळपास वर्षाकाठी ४० लाख रुपये खर्च येत असून दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे केल्यास अधिक चांगले उपक्रम राबवता येतील, असे अशोक देशमाने यांनी सांगितले.

परभणीतील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या आणि अनेकांच्या मदतीने उच्च शिक्षण पूर्ण करून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात दाखल झालेल्या अशोकला पहिल्यापासूनच सामाजिक कामांत खारीचा वाटा उचलावा असे वाटे. त्यानुसार वेतनातील काही रक्कम तो गरजू मुलांसाठी खर्च करीत असे, मात्र केवळ पैसे देऊन समस्यांचे निराकरण होत नाही, हे लक्षात आल्यावर आपण अशा मुलांकरता वेळ द्यायला हवा, हे त्याला उमजले. त्यानंतर दर शनिवारी- रविवारी सुट्टीच्या दिवशी तो मुलांना शिकवायला जाऊ लागला. अशोक दुष्काळी भागातून आल्याने त्याला या भागात वारंवार पडणाऱ्या दुष्काळाची आणि त्या ओघाने येणाऱ्या आवर्ती संकटांची पुरेशी कल्पना होती. २०१३-१५ दरम्यान मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला. कितीतरी कुटुंबांना गाव सोडावे लागले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कितीतरी पटींनी वाढले. मात्र, याबाबत केवळ एसीत बसून सुस्कारे सोडण्याऐवजी काहीतरी ठोस करावे असे त्याने मनाशी पक्के केले. आयटी क्षेत्रात काम करताना एका रात्रीत १०-१२ हजार रुपये सहज उडवणारे लोक त्याने पाहिले होते, तर दुसरीकडे इतकी रक्कम न चुकवता आल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची उदाहरणे त्याच्या नजरेसमोर होती. २०१५ साली जेव्हा सुट्टीत तो गावी गेला, तेव्हा तिथून परतताना दुष्काळापायी दोन घास खाणं मुश्कील झालेली अनेक कुटुंबे गाव सोडत असलेली तो पाहात होता. या मुलांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न त्याला राहून-राहून सतावत होता. ही मुले शिकली नाहीत, तर या दुष्टचक्रातून कधीही बाहेर पडू शकणार नाहीत, हे त्याला ठाऊक होते. तेव्हा त्याने ठरवले की, आपल्या पगारातून परिस्थितीने गांजलेल्या अशा जितक्या मुलांना शिक्षण देता येईल, तितके द्यायचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणून चांगला माणूस बनविण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला दहा बाय दहाच्या दोन खोल्यांमध्ये १८ मुलांसह स्नेहवन सुरू झाले, काळाच्या ओघात तिथे येणाऱ्या मुलांची संख्या वाढून आज स्नेहवनात २०० मुलांना आसरा मिळाला आहे. आज स्नेहवनमध्ये शिकलेली काही मुले शहरी भागांत नोकरी करत स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत.

काळाच्या तडाख्यात सापडलेल्या लेकरांसाठी काम करायचे निश्चित केल्यानंतर सुरुवातीचे ९ महिने रात्रपाळी करून मुलांचा सांभाळ करण्याची तारेवरची कसरत अशोकने केली. जेव्हा हे सगळे खूपच दगदगीचे झाले, तेव्हा पूर्णवेळ स्नेहवनचे काम करण्याचे त्याने निश्चित केले. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या या निर्णयाने त्याच्या आईबाबांना सुरुवातीला धक्का बसला हे खरे, पण नंतर त्याची धडपड, दगदग बघून त्याचे आई-बाबा अशोकच्या मदतीला आले. लग्न झाल्यानंतर पत्नी अर्चनाने मुलांची अन्नपूर्णा बनत स्नेहवन परिवाराचा सांभाळ करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. अर्चना आणि अशोक यांची अपार मेहनत पाहून पुण्यातील डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कुलकर्णी या दाम्पत्याने आळंदीपासून आठ किमी अंतरावरील आपली दोन एकर जमीन स्नेहवनला दिली आणि त्या जागेवर २०० मुलांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करणारे स्नेहवन आकार घेत आहे.

अवघ्या दहा वर्षांत स्नेहवनचा पसारा चांगला वाढला आहे. या मुलांना केवळ डोक्यावर छप्पर देणे अथवा खाऊपिऊ घालणे हा स्नेहवन सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश नव्हता, हे कायमच लक्षात ठेवून इथे आलेल्या मुलांच्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या निकोप वाढीकरता शक्य तितके सारे प्रयत्न केले जातात. शालेय शिक्षण तर मुले घेतातच, पण त्याबरोबरच मुलांना व्यावहारिक ज्ञान देण्याचा, जीवनावश्यक कला शिकण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यातील अंगभूत गुणांना जोपासता येतील, याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. मुलांना इंग्रजी संवादकौशल्ये, शाळेनंतर योग शिक्षण, संगणक प्रशिक्षण, खाद्यपदार्थ बनवणे, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती याचेही धडे दिले जातात. अकरावी-बारावीची मुले कोडिंग शिकत आहेत. तब्बल १२ हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय येथे आहे, त्याची व्यवस्था एक मुलगाच पाहतो. २० संगणकांच्या लॅबचे व्यवस्थापनही एक विद्यार्थीच करतो. उभारलेल्या सौर प्रकल्पाची जबाबदारीही मुलेच सांभाळतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अत्याधुनिक हायड्रोपोनिक शेतीचे ज्ञान व्हावे यासाठी नवीन पॉलिहाऊस उभारले आहे. या पॉलिहाऊस मध्ये मुलांना वर्टीकल फार्मिंग, हायड्रोपोनिक आणि मशरूम शेतीच्या अत्याधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्लोथ वॉशिंग अँड ड्रॉइंग सेंटरच्या माध्यमातून मुलांना कपडे धुण्याच्या व्यवसायाची ओळख करून देण्यात येत आहे. 30 किलो कपडे एकाच वेळी दोन्ही वाळवणे याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात येईल. तसेच स्नेहवन संस्थेतील दैनंदिन गरजेसाठी या मशीनचा वापर करण्यात येईल. केस कर्तनालय व ब्युटी पार्लर संकल्पनेच्या माध्यमातून मुलांना हेअर कटिंग सलून चे अत्याधुनिक शिक्षण तसेच ब्युटी पार्लर चे अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी ही लॅब उभारली आहे. तसेच टू व्हीलर व फोर व्हीलर गॅरेज प्रशिक्षण केंद्रही उभे केले आहे.

इथे प्रवेश घेणाऱ्या मुलांवर उद्योजकतेचे खास संस्कार करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुलांकरता दर तीन महिन्यांनी औद्योगिक प्रकल्पाला भेट आयोजित केली जाते. याअंतर्गत आजपावेतो अमूल डेअरी, लिज्जत पापड कारखाना अशा प्रकल्पांना मुलांनी भेट दिली आहे. उत्पादन निर्मितीकरता तेलाचा घाणा आणण्यात आला आहे, चिप्स, पापड, मसाला बनवण्याचे मशीन घेण्यात आले आहे. मुलांना श्रमदानाचे धडे दिले जात आहेत. दिवाळीला खास मुलांच्या कपडेलत्त्यांची तयारी केली जाते. राखी पौर्णिमेला राखी बनवून विकल्या जातात, आणि त्यातून आलेल्या पैशातून बहिणींना भेटवस्तू दिल्या जातात. गणेशोत्सवात मुलांकरता ११ दिवस ११ मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले जाते. भोवतालच्या परिसरासाठी स्नेहवन संस्था फिरता दवाखाना प्रकल्प राबवते. ज्ञानछत्र उपक्रमाद्वारे परिसरातील आदिवासी मुलींना शिक्षण दिले जाते, भंगार गोळा करणाऱ्या, भीक मागणाऱ्या मुलांकरता शिकवले जाते. लवकरच शिक्षणपद्धतीतील गुणवत्ता वाढविण्याकरता विज्ञान, इलेक्ट्रिक, इलोक्ट्रॉनिक्स विषयाची प्रयोगशाळा स्नेहवन सुरू करणार आहे. जास्तीत जास्त मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा अशोक देशमाने यांचा मानस आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा इतका सर्व व्याप कसा सांभाळता, यावर अशोक देशमाने सांगतात, “पैशांची चणचण नेहमीच भासते. मात्र समाजातील दानशूर व्यक्तींमुळे आजवर स्नेहवनचे विस्तारित कुटुंब तगले आहे.” त्यांचे समाजातील दानशूर व्यक्तींना त्यांचे एवढेच सांगणे आहे की, केवळ पैशांचीच मदत नव्हे, तुम्हांला जशी जमेल तशी मदत तुम्ही करू शकता. नेहमीच आमच्यापुढे वेगवेगळी आव्हाने उभी राहतात, त्याकरता समाजातील ज्यांच्याकडे संधी उपलब्ध असणाऱ्या घटकांनी समाजातील या उपेक्षित घटकांकरता पुढे सरसावायला हवे.” प्रतिकूल परिस्थितीत सापडलेल्या लहानग्यांना मायेची ऊब देऊन त्यांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देत ताठ मानेने जगता यावे, याकरता प्रयत्न करणाऱ्या अशोक देशमाने यांनी उभारलेल्या स्नेहवन संस्थेविषयी अधिक माहितीसाठी तसेच त्यांना मदत करण्यासाठी https://www.snehwan.in या वेबसाइटला भेट द्या.