प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना सोमवारी (२० फेब्रुवारी) चेंबूर येथील एका संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धक्काबुक्की झाली. यानंतर सोनू निगमने पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्याने या ठिकाणी नेमकं काय घडलं याबाबत स्वतः माहिती दिली. तसेच आरोपीचं नाव घेत त्याने कोणाकोणाला धक्का दिला हेही नमूद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनू निगम म्हणाला, “काहीही झालेलं नाही. कॉन्सर्ट झाल्यावर मी स्टेजवरून खाली उतरत होतो. आजकाल सेल्फी आणि फोटोग्राफचे जे प्रकार सुरू आहेत त्यात कोणीही समजून घेत नाही. स्वप्निल नावाच्या व्यक्तीने मला पकडलं. त्याचं नाव मला नंतर माहिती झालं. त्याने मला पकडलं, तर पहिल्यांदा मला वाचवायला हरिप्रकाश आले. त्याने हरीला धक्का दिला.”

“त्यानंतर मला धक्का दिला. त्यामुळे मीही पडलो. व्हिडीओत मीही स्टेजवर खाली पडताना दिसत आहे. बाजूला असतो, तर मी स्टेजच्या खाली पडलो असतो. त्यावेळी मला वाचवण्यासाठी रब्बानी आले. रब्बानींना तर त्याने जोरात धक्का दिला आणि ते मागे आदळले. वाचले, नाहीतर जीवच गेला असता. त्यांच्या मागे लोखंड असतं, तर त्यांचा मृत्यू झाला असता.”

व्हिडीओ पाहा :

नेमकं काय घडलं?

सोमवारी चेंबूर येथे एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सोनू निगमही उपस्थित होता. कार्यक्रम झाल्यानंतर सोनू निगम व त्याचे काही सहकारी मंचावरुन खाली उतरत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.

व्हिडीओ पाहा :

दरम्यान, या घटनेत सोनू निगम व त्याचा एक सहकारी जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमला धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीचं नाव स्वप्नील फेटरपेकर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu nigam first reaction on manhandling with him in chembur music concert mumbai pbs
First published on: 21-02-2023 at 09:18 IST