मुंबई : इमारतीच्या निमुळत्या पाईपवर स्पायडरमॅनप्रमाणे सरसर चढून चोरी करणाऱ्या एका चोराला अखेर मालाड पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सतत वेषांतर करीत होता. त्याने पश्चिम उपनगरात अनेक ठिकाणी चोरी केली होती, मात्र आजवर एकदाही तो पकडला गेला नव्हता. त्याने चोरीच्या रकमेतून गावात जमीन, तर मुंबईत घर विकत घेतले होते.
मुंबईतील पश्चिम उपनगरात एका चोराने धुमाकूळ घातला होता. इमारतीच्या पाईपवर चढून खिडकीवाटे तो घरात प्रवेश करायचा आणि अवघ्या काही वेळेत घरातील मौल्यवान सामान चोरून पसार व्हायचा. हा चोर एवढा सराईत होता की घरातील सदस्य झोपले असतानाही तो चोरी करत होता. चोरी करताना सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये यासाठी तो आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेत होता. ओळखता येईल अशी एकही खूण तो मागे ठेवत नव्हता. मालाडमधील एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावर चढून त्याने घरातील साडेचार लाख रुपयांचा ऐवज १७ मार्च रोजी चोरला होता. त्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण मालाड पोलिसांना मिळाले होते. पण नेहमीप्रमाणे त्याने चेहरा झाकला होता.
वेषांतर करणारा बहुरूपी
पोलिसांनी परिसरातील १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासून त्याचा माग काढला. मात्र तो रेल्वे रूळांच्या दिशेने पसार झाला. तेथून पुढे पोलिसांना त्याचा माग काढणे शक्य झाले नाही. या घटनेनंतर मालाड, कांदिवली, दिंडोशी, बोरिवली आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे चोरी झाली होती. या सर्व चोरीच्या प्रकरणात हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्याचा सुगावा लागत नव्हता. प्रत्येक वेळी पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे त्याचा माग काढायचे मात्र तो रेल्वे रूळाजवळ येऊन गायब व्हायचा. त्यामुळे हा चोर याच परिसरात वेषांतर करून रहात असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी सलग १७ दिवस रेल्वे रुळ परिसरात वेषांतर करून पाळत ठेवली. मालाड ते मालवणी रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण पोलिसांनी तपासले. त्याेवळी तो राठोडी येथील परिसरात गेल्याचे पोलिसांना आढळले. तो राठोडी मुख्य रस्त्यावरून बाहेर पडायचा. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांनी या भागात दोन दिवस सापळा लावला. अखेर दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. रंजीतकुमार सिंह उर्फ मुन्ना (४४) असे या चोराचे नाव आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो सतत वेषांतर करत होता. कधी महिलांचे कपडे घालणे, कधी बुरखा घालणे, कधी डिलिव्हरी बॉय बनून तो पोलिसांना चकवा देत होता. तो वेषांतर करण्यात एकदम पटाईत होता. त्यामुळे त्याला ओळखणे अत्यंत कठीण बनले होते, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले की, आरोपी रंजीतकुमार सिंह आजवर कधी पकडला गेला नव्हता. त्याची चौकशी केली असता मालाड, कांदिवली, बोरिवली, दिंडोशी आदी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८ गुन्ह्यांची उकल झाली.
मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरीच्या रकमकेतून मालमत्तांची खरेदी
आरोपी रंजीतकुमार सिंहकडून पोलिसांनी ३६ तोळे सोन्याचे दागिने, हिरे, १ किलो चांदी आणि बॅंकेत असलेले १३ लाख रुपये जप्त केले आहेत. त्याने चोरी केलेले सोने घरात वितळविण्यासाठी यंत्र आणले होते. सोने घरातच वितळवून तो विल्हेवाट लावत होता. त्याला नकली आणि खोट्या सोन्यातील फरक कळत नव्हता. पोलिसांनी त्याच्या घरातील कचऱ्याच्या डब्यातूनही काही सोने हस्तगत केले. त्याने चोरीच्या रकमेतून उत्तर प्रदेश येथील मूळ गावी १० लाखांची जमीन खरेदी केली होती, तर मालवणी येथे ६ रुपये भरून खोली विकत घेतली होती.