मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांवर अज्ञात व्यक्तींकडून पाळत ठेवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. एका बनावट ई-मेलद्वारे बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकांचे तपशील मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांचे कुटुंबिय वांद्रे पश्चिम येथे वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी डॉ. अर्शिया सिद्दीकी (३५) यांचे ‘फ्लेवर फूड व्हेंचर’ नावाचे हॉटेल आहे, तर पत्नी शेहझीन सिद्दीकी ‘झियर्स बिझनेस इंडिया एलएलपी’ नावाची रिअल इस्टेट कंपनी चालवतात. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या आठवणी जतन करण्यासाठी कुटुंबियांनी बाबा सिद्दीकी यांचा मोबाइल क्रमांक सुरूच ठेवला आहे. हा मोबाइल क्रमांक वरील दोन्ही व्यवसायाशी संलग्न ठेवण्यात आला आहे.
मोबाइल कॉल्सचे तपशील मिळविण्याचा प्रयत्न
‘व्होडाफोन’ मोबाइल कंपनीला २४ जून रोजी दिवंगत बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने एक ई-मेल आला होता. त्यात बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल क्रमांकासाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काबाबत विचारणा करण्यात आली होती. या मेलबरोबर शेहझीन सिद्दीकी यांचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, वस्तू सेवा क्रमांक (जीएसटी) आणि कुटुंबाच्या कंपनीचे लेटरहेडही वापरले होते. जर त्या व्यक्तीला अधिकृत स्वाक्षरी हक्क मिळाला असता तर बाबा सिद्दीकी यांच्या मोबाइल कॉल्सचे सर्व तपशील मिळाले असते.
असा उघडकीस आला प्रकार
कंपनीनने संबंधित व्यक्तीला अर्ज प्राप्त झाल्याचे ई-मेलद्वारे कळवले होते. कंपनीने बाबा सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया यांना देखील ई-मेलच्या सीसी मध्ये ठेवले होतते. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. याबाबत डॉ. अर्शिया यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) ( फसवणूक करणे), ६२ (कैदेस पात्र असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न), ३३५ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ३३६ (२) व ३३६ (३) (दस्तऐवजांचे बनावटीकरण), आणि ३४०(२) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदी खऱ्या असल्याचे भासवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत याप्रकरणी मायकल शर्मा, तरुण कुमार, अविनाश अरोरा आणि सुमित शर्मा या व्यक्तींची नावे समोर आली आहेत.
कोण होते बाबा सिद्दीकी ?
बाबा सिद्दीकी यांचे खरे नाव झियाउद्दीन सिद्दीकी असे होते. वयाच्या १८ व्या वर्षांपासूनचे ते कॉंग्रेस पक्षात सक्रिय होते. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) मध्ये गेले. बॉलीवूडमध्ये त्यांचा दबदबा होता. चाणाक्ष राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयोजित केलेल्या ईफ्तार पार्ट्यांना बॉलीवूड सेलिब्रेटींचा राबता असायचा. अनेक मोठ्या बॉलीवूड कलावंतांबरोबर त्यांचे घरोब्याचे संबंध होते. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे देखील आमदार होेते.