मुंबई : राज्य परिवहन (एसटी) को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी मुंबई सेंट्रल येथे आयोजित केली होती. यावेळी भ्रष्टाचाराच्या आरोपातून दोन गटात हाणामारी झाली. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांची एसटी को-ऑपरेटिव्ह बँक आशिया खंडातील सर्वात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. मुंबई सेंट्रल येथे बुधवारी एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांचा बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. बाहेरील महिलांना बोलवून संचालक मंडळातील सदस्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण प्रकरण नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले असून याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल निवडून आले आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. त्याला कंटाळून त्यांचे काही सदस्य आमच्या बाजूला आले. त्यांच्या या कारभारामुळे लोकांना आता सुरक्षित वाटत नाही. तसेच त्यांनी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे. एसटी बँकेत १२ कोटींचे एक सॉफ्टवेअर त्यांनी थेट ५२ कोटींना खरेदी केले. या आर्थिक भ्रष्टाचाराबाबत बैठकीत चर्चा सुरू झाली. मात्र, यावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलमधील सदस्यांनी वाद घालण्यास सुरुवात केला.

तसेच हे नियोजित कट कारस्थान असल्याने, बाहेरून महिलांना आणून हाणामारी करण्यात आली. शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु, संपूर्ण वस्तुस्थिती, ध्वनिचित्रफित आणि त्यातून दिसणारे दृश्य असा पुरावा आहे, असे को-ऑपरेटिव बँक एम्प्लाइज यूनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून लक्ष विचलित करण्यासाठी हाणामारीचे नियोजित कटकारस्थान केले. भ्रष्टाचारामुळे एसटी कर्मचाऱ्यांची बँक बुडाली आहे. या बँकेला वाचविण्यासाठी तातडीने प्रशासक नेमणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

या प्रकरणी एसटी कष्टकरी जनसंघाचे संचालक ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्षा ॲड. जयश्री पाटील यांच्याशी संदेशाद्वारे, फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.