लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचे रुग्ण आढळू लागले आहेत. ही बाब विचारात घेऊन साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासांठी राज्यस्तरीय वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे साथीच्या आजारांचा उद्रेक झालेल्या भागात स्वतंत्र वॉर रूम कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामुळे साथीच्या आजारांची लागण झालेल्या नागरिकांवर वेळीच योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.

जूनच्या तुलनेत जुलैमध्ये साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली असून मुंबई, पुणे, ठाणे शहरांसह पालघर, गडचिरोली, नाशिक या जिल्ह्यांमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळू लागले आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यस्तरीय वॉर रूम कार्यान्वित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे साथीच्या आजारांचा उद्रेक झालेल्या किंवा मोठ्या संख्येने साथीच्या आजारांचे रुग्ण आढळत असलेल्या ठिकाणी एक स्वंतत्र वॉर रूम कार्यान्वित करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाला केल्या आहेत. उद्रेकग्रस्त भागामधील वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रुमशी संलग्न असावी, वॉर रुमला साथीच्या आजाराची बाधा झालेल्या रुग्णांची, तसेच प्रादुर्भावाबाबतची माहिती २४ तासांत द्यावी, असे निर्देश तानाजी सावंत यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला रुग्णालय बांधण्यासाठी १०० कोटींचं कंत्राट, किरीट सोमय्यांनी हिशेबच मांडला!

प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरुकता करणार

साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव आणि रुग्णची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने विविध मोहिमा राबवाव्यात. तसेच घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करावी, या सर्वेक्षणादरम्यान कुटुंबांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करावी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात हिवतापाच्या रूग्णांची संख्या अधिक असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्या, धूर फवारणी नियमित करावी, बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.