मुंबई : अलीकडेच साजरा झालेल्या जागतिक ब्रेन स्ट्रोक दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी स्ट्रोकबाबत नवा दृष्टिकोन मांडला आहे. आतापर्यंत स्ट्रोकनंतरच्या ‘गोल्डन अवर’ उपचारांवर भर दिला जात होता. मात्र आता डॉक्टरांचा भर स्ट्रोक होण्याआधीच प्रतिबंध या संकल्पनेवर आहे. मेंदूत ब्लॉकेज निर्माण होण्याआधीच स्टेंट बसवून स्ट्रोक टाळण्याची नवी पद्धत वैद्यकीय क्षेत्रात वेगाने स्वीकारली जात आहे. जसे की ह्रदयविकाराचा त्रास आढळल्यास ब्लॉकेज लक्षात घेऊन अँजिओप्लास्टी केली जाते तसेच मेंदुतील रक्तवाहिन्यांमधील अडथळा लक्षात घेऊन स्टेंट बसवला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्ट्रोकनंतरच्या ‘गोल्डन अवर’ म्हणजे पहिल्या काही तासांत उपचार मिळाले तर मेंदूचे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. पण आता डॉक्टरांचा भर ‘गोल्डन अवर’च्या आधीच्या टप्प्यावर म्हणजेच ‘गोल्डन प्रिव्हेन्शन’वर दिला जात आहे.नवीन इमेजिंग तंत्रज्ञान, मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचे स्कॅनिंग आणि प्रिव्हेंटिव्ह स्टेंटिंग या तिन्ही गोष्टींच्या मदतीने अनेक रुग्णांना स्ट्रोक होण्याआधीच वाचवणे शक्य होत आहे.स्ट्रोक झाल्यानंतर अडकलेला रक्तप्रवाह मोकळा करण्यासाठी स्टेंट लावण्याची प्रथा आहेच पण आता प्रिव्हेंटिव्ह स्टेंटिंग म्हणजेच आधीच धोका ओळखून स्टेंट बसवण्याची दिशा वैद्यकशास्त्रात झपाट्याने विकसित होत आहे.

मुंबईतील न्यूरोइंटरव्हेन्शन तज्ञांच्या मते, आधुनिक स्कॅनिंग आणि इमेजिंग तंत्रज्ञानामुळे आता मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांतील अडथळे आधीच ओळखता येतात. डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए), सीटी अँजिओग्राफी आणि एमआर अँजिओग्राफीसारख्या तपासण्यांमुळे मेंदू किंवा मानेतील धमनीतील अरुंदपणा शोधता येतो. हा अडथळा पुढे जाऊन स्ट्रोकचे कारण ठरू शकतो.अशा वेळी डॉक्टर प्रतिबंधात्मक स्टेंटिंगचा सल्ला देतात. ही प्रक्रिया हृदयातील अँजिओप्लास्टीप्रमाणेच असते. मेंदूतील अरुंद झालेल्या धमनीत छोटा धातूचा स्टेंट बसवून रक्तपुरवठा सुरळीत ठेवला जातो. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित राहतो आणि स्ट्रोक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, हृदयरोग किंवा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींना स्ट्रोकचा धोका अधिक असतो. अशा व्यक्तींनी मेंदूतील रक्तवाहिन्यांची नियमित तपासणी करून घ्यावी. वेळेत हस्तक्षेप केल्यास मोठी हानी टाळता येते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.पूर्वी रुग्ण स्ट्रोकनंतर हॉस्पिटलमध्ये येत असत, पण आता आरोग्य तपासणीतून मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा ‘हेल्थ चेकअप’ करून घेण्याकडे लोक वळत आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हे अगदी हृदयाच्या अँजिओग्राफीसारखेच आहे. जसे हृदयात ब्लॉकेज ओळखून स्टेंट बसवून हृदयविकाराचा झटका टाळता येतो, तसेच आता मेंदूतही ब्लॉकेज ओळखून स्ट्रोक होण्यापूर्वीच त्याचा धोका टाळता येतो.तथापि सर्व रुग्णांसाठी स्टेंटिंग योग्य असेलच असे नाही. काही प्रकरणांमध्ये औषधोपचार, रक्तदाब नियंत्रण, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल पुरेसे ठरतात असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.तज्ज्ञांच्या मते मेंदूतील प्रतिबंधात्मक स्टेंटिंग हे ‘आपत्कालीन बचाव’ नव्हे तर ‘स्मार्ट प्रतिबंध’ आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही नवी दिशा केवळ स्ट्रोकनंतरच्या उपचारांवरच नाही तर स्ट्रोक होण्याआधीच संरक्षण देणारी ठरत आहे.

परिणामी नवीन इमेजिंग तंत्रज्ञान आणि प्रतिबंधात्मक स्टेंटिंगमुळे आता स्ट्रोक झाल्यानंतर उपचार करण्याऐवजी तो टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, स्ट्रोकचा धोका वेळीच ओळखा, वेळेत तपासणी करा आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रतिबंधक उपाय करा.स्ट्रोक हा केवळ अचानक होणारा प्रसंग नाही, तर तो ओळखता येण्यासारखा आणि रोखता येण्यासारखा आजार आहे हे आता वैद्यकीय क्षेत्राने दाखवून दिले आहे. मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील प्रगत तपासणी आणि प्रतिबंधात्मक स्टेंटिंगच्या माध्यमातून आता ‘स्ट्रोकनंतर बचाव’ऐवजी ‘स्ट्रोकपूर्व बचाव’ हा नवा आरोग्य मंत्र ठरत आहे.