मुंबई : देशभरातील रेल्वेगाड्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेगाड्यांना नव्या धाटणीचे लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात येत आहेत. असे असले तरी विविध राज्यांतील रेल्वेगाड्यांना एलएचबी डबे जोडण्यात आले नव्हते. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमधील प्रवास सुकर होत नव्हता. आता हळूहळू राज्यांतर्गत रेल्वेगाड्यांना एलएचबी जोडण्यात येत आहेत. पनवेल आणि पुण्यावरून नांदेड जाणाऱ्या रेल्वेगाडीला अत्याधुनिक प्रकारातील एलएचबी डबे जोडून, प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व रेल्वेगाड्यांना एलएचबी प्रकारातील डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेगाड्यांचा अपघात झाल्यास एलएचबी डब्यांमुळे जीवितहानी कमी होते. त्यामुळे ते प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तसेच रेल्वेगाड्यांचा वेगही वाढवण्यास मदत होते. डब्यांची वाढविण्यात आलेली लांबी आणि रूंदी, मोठे प्रवेशद्वार, सुधारित रचनेचे बेसिन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपातील गाड्यामुळे नांदेड आणि पनवेल, पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
हुजूर साहेब नांदेड – पनवेल दरम्यान ६७५ किमी अंतर असून या प्रवासासाठी २४ तास लागतात. या रेल्वेगाडीला जुन्या पद्धतीचे पारंपरिक डबे होते. तर, आता गाडी क्रमांक १७६१४ हुजूर साहेब नांदेड – पनवेल एक्स्प्रेसला १ मे रोजी एलएचबी डबे जोडण्यात आले आहेत. तर, गाडी क्रमांक १७६१३ पनवेल- हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेसला २ मे रोजी एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच या रेल्वेगाडीची एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी संरचना असेल.
हुजूर साहेब नांदेड – पुणे दरम्यान ६५७ किमी अंतर असून या प्रवासासाठी १३.२० तास कालावधी लागतो.या रेल्वेगाडीलाही जुने पारंपरिक डबे होते. तर, आता गाडी क्रमांक १७६३० हुजूर साहेब नांदेड – पुणे एक्स्प्रेसला ३ मेपासून आणि गाडी क्रमांक १७६२९ पुणे ते हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेसला ४ मेपासून एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच या रेल्वेगाडीची एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी संरचना असेल.या विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यांची माहिती भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर आणि एनटीईएस ॲपवर उपलब्ध असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.