मुंबई: मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. जनतेचे जीव घेऊन होणारी समृद्धी नको असून महामार्गावर कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे या महामार्गावर अपघात रोखणाऱ्या उपाययोजना होत नाहीत तोवर त्यावरील वाहतूक बंद करावी अशी मागणी विरोधकांनी बुधवारी विधानसभेत केली.
विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख आदी सदस्यांनी समृद्दी महामार्गाचे काम सुरू असताना शहापूर जवळ झालेल्या अपघाताचा उल्लेख करीत सरकावर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीच्या आधी या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा अट्टाहास असून त्याच्या घाईतून हा अपघात झाला असून त्यात हकनाक २० लोकांचे बळी गेल्याचा आरोप विरोधकांनी केला.
शहापूर येथील अपघात प्रकरणा ज्या कंपन्यांना काम देण्यात आले होते त्यांना काळय़ा यादीत टाकण्याची मागणीही सदस्यांनी केली. त्यावर खुलासा करताना सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांनी शहापूर येथील अपघाताताबाबत माहिती दिली. समृद्धी महामार्गाच्या सुमारे ७०१ किमी लांबीच्या मार्गापैकी ६०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून नाशिक आणि ठाणे जिल्हयातील १०१ किमीचे काम प्रगतीपथावर आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे २.२८ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम सुरु असताना क्रेन कोसळल्याने अपघात होऊन २० कामगारांचा मृ्त्यू झाला असून तीन जखमी आहेत.