करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सभा, समारंभांवर बंदी, ५० टक्के च कार्यालयीन उपस्थिती, विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. रेल्वेप्रवासावर मात्र अद्याप तरी निर्बंध लागू करण्यात आलेले नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने स्वयंशिस्त पाळा, अन्यथा टाळेबंदी लागू करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्याच महिन्यात दिला होता. मात्र, राज्य सरकारने सरसकट टाळेबंदी करण्याऐवजी कठोर निर्बंध लागू के ले आहेत. ३१ मार्चपर्यंत हे सारे निर्बंध लागू राहतील, असा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला. करोना रुग्ण वाढल्यास टाळेबंदी अथवा कठोर निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने यापूर्वीच स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. गर्दी कमी करण्यावर सरकारने भर दिला आहे.

सर्व कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के  उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. शक्यतो घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करणारी कार्यालये करोना महासाथ आटोक्यात येईपर्यंत बंद करण्यात येतील, असे कठोर पाऊल सरकारने उचलले आहे. सध्या खासगी तसेच सरकारी कार्यालयांमध्ये १०० टक्के  उपस्थिती असल्याने गर्दी वाढली आहे.

सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेल हे ५० टक्के  प्रवेश क्षमतेवरच सुरू राहतील. मॉल्सचालकांनाही लोकांना प्रवेश देताना सिनेमागृह, हॉटेलमध्ये ५० टक्के  क्षमतेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-धार्मिक कार्यक्रम-सभांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही सभागृहाने-आस्थापनेने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी दिल्यास करोना आपत्ती संपेपर्यंत ती आस्थापना बंद ठेवली जाईल. के वळ लग्नासाठी जागा देता येईल. पण विवाह समारंभाला के वळ ५० जणच उपस्थित राहू शकतील. अंत्यसंस्कारालाही केवळ २० जणांनाच परवानगी देण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थेने याची अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यायची आहे.

सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एका दिवसात आणि एका तासात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल हे जाहीर करावे. शक्यतो ऑनलाइन नोंदणी करूनच दर्शनासाठी प्रवेश द्यावा. गृहविलगीकरणात असलेल्यांच्या घरावर त्याबाबतची माहिती १४ दिवसांसाठी द्यावी, स्थानिक स्वराज्य संस्था व डॉक्टरांच्या देखरेखीखालीच गृहविलगीकरण करता येईल. तसेच संबंधितांच्या हातावर त्याबाबतचा शिक्का मारला जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तीला थेट करोना केंद्रात दाखल के ले जाईल.

प्रवेशाचे नियम

– धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, हॉटेल, सिनेमागृह, मॉल्स, कार्यालये अशा सर्व आस्थापनांनी मुखपट्टी वापरलेल्यांनाच प्रवेश द्यावा

– सॅनिटायझरची व्यवस्था जागोजागी करावी.

नियमभंग केल्यास करोना आपत्ती संपेपर्यंत बंदी

सभा-समारंभांची कार्यालये, हॉटेल व चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, खासगी व्यावसायिक कार्यालयांनी निर्बंधांचे पालन न के ल्यास, करोनाविषयक शिस्त न पाळल्यास थेट करोना आपत्ती संपेपर्यंत ही आस्थापने बंद करण्यात येतील, असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारने करोना ही आपत्ती म्हणून जाहीर केली असून केंद्र सरकार जोपर्यंत ती अधिसूचना उठवत नाही तोपर्यंत निर्बंधांचे उल्लंघन करणारी आस्थापने बंद करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रेल्वे वापरास मुभा

राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले असले तरी मुंबई व ठाणेकरांच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवासावर कोणतेही निर्बंध लागू के लेले नाहीत. यापूर्वी लागू के लेल्या नियमानुसारच रेल्वेचा वापर करता येईल. कार्यालयीन उपस्थितीवर निर्बंध आणल्याने रेल्वे गाड्यांमधील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. तीन-चार दिवसांत त्याचा आढावा घेऊनच मग पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच वाहनांतून प्रवास करण्यावर अद्याप तरी कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.

नवे नियम काय?

  • सभा, समारंभांवर बंदी. विवाह समारंभाला फक्त ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांच्या उपस्थितीस परवानगी.
  • सर्व कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के उपस्थितीस परवानगी. शक्यतो घरून काम करण्यावरच भर देण्याची सूचना.
  • सर्व प्रकारची सिनेमागृहे, हॉटेलांना ५० टक्के प्रवेश क्षमतेची मर्यादा.
  • नियमभंग केल्यास आस्थापनांवर करोना आपत्ती संपेपर्यंत बंदी.
  • सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समित्यांनी एका दिवसात किती भाविकांना प्रवेश दिला जाईल हे जाहीर करावे.

राज्यात करोनाचे १५,०५१ नवे रुग्ण

मुंबई  : राज्यात सोमवारी करोनाच्या १५,०५१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात दिवसभरात दोन हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. दिवसभरात मुंबई १७१३, नागपूर २०९४, पुणे ११२२, पिंपरी-चिंचवड ६९८, उर्वरित पुणे जिल्हा ३६३, नाशिक ६७१, जळगाव जिल्हा ५००, औरंगाबाद ६५७, अमरावती शहर २२७, वर्धा ३४५ रुग्ण आढळले. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक म्हणजे २६ हजारांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.

पंतप्रधानांचा उद्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. बुधवारी दुपारी १२.३० वाजता दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक होईल. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून, आतापर्यंत तीन कोटींहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण मोहीम आणखी वेगाने राबविण्याबरोबरच करोना नियंत्रणासाठी आणखी पावले उचलण्याबाबत या बैठकीत चर्चा होईल.

‘कोव्हिशिल्ड’चा तुटवडा?

मुंबई, पुणे, ठाणे : लशीची पहिली मात्रा घेणाऱ्यांसाठी ‘कोव्हॅक्सिन’चा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्याने ‘कोव्हिशिल्ड’लशीचा पुरेसा साठा नसल्याचे चित्र पुणे आणि ठाण्यात सोमवारी निर्माण झाले. पहिली मात्रा घेणाऱ्यांना कटाक्षाने ‘कोव्हॅक्सिन’च देण्याच्या सूचनांमुळे सोमवारी पुण्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊन गोंधळ उडाला. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ‘कोव्हॅक्सिन’ची मात्रा द्यायची की ‘कोव्हिशिल्ड’ची, या संभ्रमामुळे ज्येष्ठांना मनस्ताप झाला, तर ठाण्यात ‘कोव्हिशिल्ड’चा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. परंतु, ‘कोव्हिशिल्ड’ची पहिली मात्रा घेतलेल्यांना दुसरी मात्रा देण्यासाठी पुरेसा साठा असल्याचे दोन्ही महापालिकांनी स्पष्ट केले. मुंबईत ‘कोव्हिशिल्ड’च्या सुमारे तीन लाख मात्रा आणि ‘कोव्हॅक्सिन’च्या सुमारे ६८ हजार मात्रा उपलब्ध असल्याने तुडवड्याचा प्रश्नच नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strict restrictions again in the state abn
First published on: 16-03-2021 at 00:59 IST