लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या गो. ब. देवल स्मृति पुरस्कार सोहळ्यात व्यावसायिक व प्रायोगिक मराठी रंगभूमीवरील सर्व विभागातील कलावंत, तंत्रज्ञ यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.

यंदा मराठी व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक पुरस्कारासाठी ‘नियम व अटी लागू’ या नाटकाची निवड करण्यात आली असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार चंद्रकांत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना ‘नियम व अटी लागू’ या नाटकासाठी जाहीर करण्यात आला आहे. तर, मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यावर्षी लीना भागवत यांना ‘इवलेसे रोप’ या नाटकासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याचबरोबर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून मयुरेश पेम याला ‘ऑल द बेस्ट’ या नाटकासाठी, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री म्हणून शलाका पवार हिला ‘हीच तर फॅमिलीची गंम्मत’ या नाटकासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच, मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक म्हणून रंगशारदा प्रतिष्ठान या संस्थेच्या ‘डबल लाईफ’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू, १० जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी

त्याचबरोबर, प्रायोगिक, हौशी रंगभूमीवर कार्य करणाऱ्या संस्था व कलावंतांना देखील दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गो. ब. देवल स्मृति पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीत नाटक पुरस्कार, परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई या संस्थेच्या ‘संगीत जय जय गौरीशंकर’ नाटकास जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईच्या शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान या संस्थेच्या ‘आय ॲम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ’ या नाटकास सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर प्रायोगिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी इरफान मुजावर यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व पुरस्कार प्राप्त कलावंतांना १४ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मांटुगा येथे होणाऱ्या सोहळ्यात पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले.

आणखी वाचा-अंधेरीत २९, ३० मे रोजी पाणीपुरवठा बंद, काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा

पुरस्कारांची यादी

  • आशुतोष गोखले -सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार (नाटक – जर तर ची गोष्ट)
  • पर्ण पेठे – सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार (नाटक – चार चौघी)
  • संदेश बेंद्रे – सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (नाटक – २१७ पद्मिनी धाम)
  • अमोघ फडके – सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना (नाटक- जर तर ची गोष्ट)
  • सौरभ भालेराव – सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार (नाटक – आजीबाई जोरात)
  • उल्लेश खंदारे – सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार (नाटक – कुर्र)
  • विवेक बेळे – प्रायोगिक नाटक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( नाटक – यह जो पब्लिक है)
  • प्रशांत निगडे – प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेता ( नाटक – आय एम पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ)
  • बकुळ धवने – प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नाटक – दि फिअर फॅक्टर)
  • विशारद गुरव – प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता (नाटक – संगीत जय जय गौरीशंकर)
  • शारदा शेटकर – प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री (नाटक -संन्यस्त खड्ग)