मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मंजूर करण्याची जबाबदारी प्रवेश नियामक प्राधिकरणाची असतानाही मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मंजूरीच देण्यात आलेली नाही. शिक्षण पूर्ण होऊनही विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला प्राधिकरणकडून मान्यता नसल्याने त्यांचे भविष्य अंधारात आहे. प्रवेश मंजुरीबाबत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करूनही त्यांना ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत असल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.
विनाअनुदानित महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘प्रवेश मंजुरीचा प्रस्ताव’ प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम मुदतीनंतर १५ दिवसांच्या आत संबंधित संचालनालयाकडे पाठवणे आवश्यक असते. महाविद्यालयांकडून पाठविण्यात आलेल्या प्रत्येक प्रस्तावाची प्रत्येक वर्षाच्या ३१ जानेवारीपूर्वी छाननी करून त्याला मान्यता देण्याची जबाबदारी प्रवेश नियामक प्राधिकरणची असते. मात्र राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राज्य सामाईक प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या जवळपास हजारो विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेश मंजुरीचा प्रस्तावा’वर मागील काही वर्षांमध्ये प्रवेश नियामक प्राधिकरणाने कोणताही निर्णय घेतला नाही.
त्यामुळे पदवीच्या अंतिम वर्षाला उत्तीर्ण होऊनही या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून निकाल व अन्य कागदपत्रे देण्यात आली नाहीत. याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे विचारणा केली असता प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून अद्याप तुमच्या प्रवेशाला मान्यता दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ‘प्रवेश मंजूरी प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी अनेक विद्यार्थी वारंवार प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. त्यांच्याकडे कधी काही कागदपत्रांची मागणी केली जाते तर कधी अद्याप सुनावणी झाली नाही, तर कधी सुनावणी झाली आहे, लवकरच निर्णय होईल, अशी कारणे देत प्रमाणपत्रे अडवून ठेवण्यात आली आहेत.
पदवी परीक्षा उत्तीर्ण हाेऊन चार ते पाच वर्षे झाली तरी गुणपत्रिका व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. तर काही विद्यार्थ्यांना कुठेही नोकरीसाठी अर्ज करता येत नाही. विधि अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे नसल्याने ‘सनद’ घेता येत नाही. त्यामुळे शिक्षण आहे पण पदवी नाही, अशी या विद्यार्थ्यांची अवस्था झाली आहे. रितसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश घेतला असतानाही आमचे प्रवेश का मंजूर केले जात नाहीत. प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून मागण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रवेश मंजुरीचा प्रस्ताव का रोखण्यात आला आहे, असा प्रश्न ही विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मागील दोन महिन्यांत आम्ही बहुतांश अर्ज निकाल काढले असून उर्वरित अर्ज या महिन्यामध्ये निकाली निघतील. विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. – दिलीप सरदेसाई, सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरण.