मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पुष्पगुच्छ देवून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अमित सैनी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या ध्येयाबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी या मुक्त संवादात आपण भविष्यात कोणता शैक्षणिक मार्ग निवडणार याबाबत सांगितले. सैनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर डॉ. सैनी यांनी स्वत:चा शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रवासही उलगडून दाखविला.

महानगरपालिका शिक्षण विभागाने परीक्षेसाठी जी तयारी करून घेतली त्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. ‘मिशन मेरिट’ सराव पुस्तिका, परीक्षेचा सराव होण्याकरिता शिक्षण मंडळाच्या धर्तीवर शालेय स्तरावर सोडविण्यात आलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचीही मोलाची मदत झाली, असे गुणवंत विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. त्यावेळी उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी सुजाता खरे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

यशवंत विद्यार्थ्यांमध्ये वरळी सी फेस महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील अक्षरा अजय वर्मा (९६.८० टक्के), गजधर पार्क माणेकजी माध्यमिक शाळेची नंदिनी शगुनलाल यादव (९६.२० टक्के), गुंदवली मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेतील सेजल शेर बहादूर यादव (९५.६० टक्के), धारावी टी. सी. विनाअनुदानित माध्यमिक शाळेतील अकिब हारुन अन्सारी (९५ टक्के) आणि सीताराम मिल मुंबई पब्लिक स्कूलमधील श्रावणी दीपक सावंत (९५ टक्के) यांचा समावेश होता.

तसेच के पूर्व विभागातील मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर या सीबीएसई मंडळाच्या इयत्ता दहावीतील मिशबाह फारुखी (९१ टक्के), भाग्येश साटम (८९.६ टक्के), आराध्य पाटील (८९.४ टक्के), कीर्ती मौर्या (८९.४ टक्के) आणि निखिल यादव (८९.२ टक्के) यांचा देखील समावेश होता. सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या पाच क्रमांकांवर मुलींनी बाजी मारली आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी महानगरपालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १४ हजार ९६६ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३ हजार ९०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सरासरी निकाल ९२.९२ टक्के इतका लागला आहे.