मुंबई : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या विस्तृत अभ्यासातून महिलांच्या आरोग्याविषयी धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि रक्तातील चरबीचे असंतुलन यांचा एकत्रित परिणामातून महिलांमध्ये गर्भाशय, अंडाशय आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका झपाट्याने वाढत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे. भारतीय महिला समाजात वाढत चाललेल्या निष्क्रिय जीवनशैली, ताण, फास्टफूड आणि झोपेअभावी हा धोका आणखी तीव्र झाला आहे.
एका अभ्यासानुसार, मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका २६ टक्क्यांनी, गर्भाशय आतील आवरणाच्या कर्करोगाचा धोका ४५ टक्क्यांनी आणि अंडाशयाच्या कर्करोगाचा धोका इतर महिलांपेक्षा तीनपट जास्त असतो. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. सुसन इडिकुला-थॉमस यांनी केले असून, सहसंशोधक डॉ. डेनी जॉन (एमएस रमैया विद्यापीठ, बेंगळुरू) यांनी या निष्कर्षांना जागतिक स्तरावरील संशोधनाशी जोडले आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये हार्मोनल असंतुलन आणि इन्सुलिन प्रतिकार अधिक दिसून येतो. ही स्थिती शरीरात सूज निर्माण करते आणि तीच कर्करोग पेशींच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार करते, असे डॉ. थॉमस यांनी सांगितले.
द लॅन्सेट ऑन्कॉलॉजी २०२४ च्या अहवालानुसार, मेटाबॉलिक सिंड्रोम हे जगभरात सुमारे २५ टक्के लोकसंख्येमध्ये आढळते, तर भारतात हा दर तब्बल ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील महिलांमध्ये हा दर ३५ टक्के असून पुरुषांमध्ये २६ टक्के आहे. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हटरी २०२४ च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात सुमारे पाच लाख स्त्रीरोगविषयक कर्करोगांचे नवे रुग्ण आढळतात, त्यापैकी सुमारे एक लाख प्रकरणे भारतातील आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या नोंदीनुसार, महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत स्त्रीरोगविषयक कर्करोगांच्या घटनांमध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली आहे, आणि त्यापैकी ४० वर्षांखालील महिलांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलेले आहे.
आयसीएमआरच्या अहवालानुसार, भारतात लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही तिन्ही लक्षणे एकत्र दिसणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत चालले आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (एनएफएचएस-५) च्या आकडेवारीनुसार, १८ ते ४९ वयोगटातील प्रत्येक चार महिलांपैकी एक जाड किंवा स्थूल आहे, तर ११ टक्क्यांहून अधिक महिलांना मधुमेह आणि १४ टक्क्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्ली या राज्यांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याचा थेट संबंध स्त्रीरोगविषयक कर्करोगांच्या घटनांशी जोडला जात आहे.टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेटाबॉलिक सिंड्रोम हा २१व्या शतकातील नवा ‘कर्करोगाचा बीज’ आहे. हा सिंड्रोम केवळ हृदयविकारांचेच नव्हे तर गर्भाशय, अंडाशय आणि स्तनांच्या कर्करोगांचेही मूक कारण ठरत आहे. आजच्या काळात महिलांनी वजन नियंत्रण, आहार आणि नियमित तपासण्या याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
संशोधनातून दिसून आले की, इन्सुलिन प्रतिकार ही या सिंड्रोमची प्रमुख कडी आहे. जेव्हा शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्याचवेळी इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाणही वाढते. हाच अतिरिक्त इस्ट्रोजेन गर्भाशय व अंडाशयातील पेशींच्या वाढीला चालना देतो. या जैविक प्रक्रियेने कर्करोग पेशींच्या वाढीला दीर्घकाळ पोषक वातावरण मिळते.
शहरी भागात मेटाबॉलिक सिंड्रोमचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाणे या भागांतील ४० टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये या सिंड्रोमची लक्षणे दिसतात. रात्रपाळ्या, झोपेचे असंतुलन, ताण, फास्टफूड आणि निष्क्रिय जीवनशैली हे प्रमुख घटक आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भारतातही हा सिंड्रोम आता २० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सातारा, सोलापूर, अमरावती आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण मागील पाच वर्षांत १५ टक्क्यांनी वाढले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्याआकडेवारीनुसार, जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोमचे प्रमाण १८ ते २० टक्क्यांच्या दरम्यान असून, भारतात ते दुप्पट आहे. द लॅन्सेट ऑन्कॉलॉजी मध्ये नमूद केल्याप्रमाणे, भारत हा दक्षिण आशियातील मेटाबॉलिक सिंड्रोम हॉटस्पॉट बनत चालला आहे.आणखी एका संशोधनात एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे, यात मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये स्त्रीरोगविषयक कर्करोगाबरोबरच गर्भधारणेतील गुंतागुंत, वंध्यत्व, मासिक पाळीतील अनियमितता आणि पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम या समस्या अधिक आढळतात. म्हणजेच हा सिंड्रोम महिलांच्या संपूर्ण प्रजनन आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करतो.संशोधकांच्या मते, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि कर्करोग हे दोन्ही ‘प्रिव्हेंटेबल’ आहेत.
आहारातील बदल, नियमित व्यायाम, झोपेचे नियमन, ताणतणाव नियंत्रण आणि वार्षिक आरोग्य तपासणी यामुळे या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगासने, साखरेचे आणि प्रक्रियायुक्त अन्नाचे सेवन कमी करणे, ताज्या भाज्या, फळे आणि पूर्ण धान्यांचा समावेश असलेला आहार हे प्राथमिक पाऊल ठरू शकते. त्यामुळे कर्करोगाशी लढण्यापेक्षा तो टाळण्याचा प्रयत्न अधिक प्रभावी ठरतो. मेटाबॉलिक सिंड्रोम रोखल्यास कर्करोगही रोखता येतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.