Sucheta Dalal Mumbai Beach Garbage Video: प्रसिद्ध पत्रकार सुचेता दलाल यांनी आज मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरील कचऱ्याशी संबंधित एक मुद्दा एक्सवर एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिकेसह मुख्यमंत्री कार्यालयालाही टॅग करत कचरा व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचबरोबर हा मुद्दा महापालिकेने आणि राज्य सरकारने गांभीर्याने घ्यावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही सुचेत्रा दलाल यांनी केले आहे.

समुद्राने किनाऱ्यावर फेकलेला कचरा

सुचेता दलाल यांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईतील एका समुद्रकिनाऱ्यावर सर्वत्र कचरा पसरल्याचे दिसत आहेत. या व्हिडिओला त्यांनी, “प्रिय बीएमसी, हा आज सकाळचा फोटो. समुद्राने किनाऱ्यावर फेकलेला कचरा! जागे व्हा प्रभादेवीकर!”, असे कॅप्शन दिले आहे.

हे धाडस कराल का?

पोस्टमध्ये पुढे सुचेता दलाल यांनी दावोस आर्थिक परिषदेचा उल्लेख करत मुख्यमंत्री कार्यालयासमोर कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत त्या म्हणाल्या की, “तंत्रज्ञानाचा वापर करून यावर सोपे उपाय करता येऊ शकतात! आपण दावोस येथील आपले फोटो अभिमानाने दाखवले, पण गुंतवणूकदारांना तुम्ही इथे आमंत्रित करण्याचे धाडस कराल का?”

राज ठाकरे, आम्हाला मदत करा…

यानंतर केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये सुचेता दलाल यांनी हा कचऱ्याचा मुद्दा सोडवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “राज ठाकरे, कृपया या विषयात आम्हाला मदत करा. हा प्रश्न तुमच्या दाराशीच आहे. हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे, ज्याच्याकडे कोस्टल रोडच्या दहाव्या भागाइतकेही लक्ष दिले जात नाही. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मी तयार आहे!”

मुंबईकरांनी स्वतःलाच दोष देण्यापूर्वी…

सुचेता दलाल यांच्या या पोस्टवर टिप्पणी करताना एका युजरने म्हटले की, “असा कचरा टाकणारे लोक स्वतः घाणेरडे असतात आणि ते स्वतःसारखेच घाणेरडे लोक निवडून देतात.”

यावर प्रतिक्रिया देताना सुचेता दलाल म्हणाल्या की, “आपण मुंबईकरांनी स्वतःलाच दोष देण्यापूर्वी हे पाहिले पाहिजे की, मुंबई महानगरपालिकेचे बजेट अनेक राज्यांपेक्षा मोठे आहे. असे असतानाही, कचऱ्याचे ढिग रोखण्यासाठी ट्रॅश बूम्स आणि योग्य सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा पुरवणे महापालिकेची जबाबदारी नाही का? बेकायदा होर्डिंग्ज आणि अतिक्रमण केलेल्या फुटपाथसाठीही आपणच जबाबदार आहोत का? थोडे वास्तववादी व्हा!”